Home » नितीन गडकरी धमकीप्रकरणी एनआयए नागपुरात

नितीन गडकरी धमकीप्रकरणी एनआयए नागपुरात

by Navswaraj
0 comment

नागपूर : केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा जयेश पुजारी ऊर्फ कांथाची ऊर्फ शाकीर चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) पथक गुरुवार, २५ मे २०२३ रोजी नागपुरात दाखल झाले.

गडकरी प्रकरणाचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत जाऊन पोहोचल्याने आता राष्ट्रीय तपास यंत्रणेने याप्रकरणी तपास सुरू केला आहे. एनआयएचे पथक नागपुरात पोहोचल्यानंतर त्यांनी घटनेचा तपास करीत असलेल्या नागपूर पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशीही चर्चा केली.

कांथाने १४ फेब्रुवारी २०२३ रोजी नागपुरातील नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून खंडणी मागितली होती. खंडणी मागण्यासोबतच त्याने गडकरींना जीवे मारण्याची धमकीही दिली होती. कांथा हा त्यावेळी कर्नाटक राज्यातील तुरुंगात होता. तुरुंगातून त्याने हे कृत्य केल्याने खळबळ उडाली होती. पहिल्या कॉलवर त्याने १०० कोटी रुपये तर दुसऱ्या कॉलवर १० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. २८ मार्च २०२३ रोजी कांथाला बेळगाव तुरुंगातून नागपूर पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून तो नागपूर पोलिसांच्या ताब्यात आहे.

कांथाचे तार अनेक दहशतवादी संघटनांशी जुळले आहेत. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा, अल बदर, पीएफआय, पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय आणि दाऊद गँगशीही त्याचा संबंध तपासात पुढे आला आहे. त्यामुळे नागपूर पोलिसांनी याबाबतची माहिती केंद्रीय तपास यंत्रणांना दिली. ही माहिती मिळताच आता एनआयए देखील कांथाची चौकशी करणार आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!