Home » राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील अधिवेशनातून निलंबित

राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील अधिवेशनातून निलंबित

by Navswaraj
0 comment

नागपूर : विधानसभा अध्यक्षांच्या प्रति अशोभनीय शब्द वापरल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे. नागपूर अधिवेशनाचा कालावधी संपेपर्यंत सदस्यत्व निलंबित करण्यात आले आहे.

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्यासंदर्भात सांगितले, कुणीही अशा प्रकारे शब्द उच्चारू नये. चर्चा करून प्रश्न सोडवावा अशी विनंती अजित पवार यांनी केली. पाटील यांना नागपूर अधिवेशनाचा कालावधी संपेपर्यंत सदस्यत्व निलंबित करण्यात आले. विधिमंडळाच्या परिसरात येण्यासही बंदी घालण्यात आली. आचरण व नीती मूल्य समिती गठित करण्याची घोषणाही नार्वेकर यांनी केली. पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान आमदार भास्कर जाधव यांना बोलण्याची संधी द्यावी या मागणीसाठी विरोधी पक्षनेते अजित पवार हे सभागृहात अध्यक्ष यांना विनंती करीत होते याच वेळी राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील हे सुद्धा विधानसभा अध्यक्षांना भास्करराव यांना बोलण्याची संधी देण्याबाबत विनंती करीत होते. मात्र विधानसभा अध्यक्षांकडून त्याला प्रतिसाद दिला जात नव्हता. यासंदर्भात बोलताना जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द वापरला.

जयंत पाटील यांच्याकडून तोंडून अपशब्द निघाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी हा शब्द पकडून जयंत पाटील यांचा सभागृहात निषेध केला तसेच त्यांच्यावर कारवाईची जोरदार मागणी केली त्यामुळे सभागृहात गदारोळ निर्माण झाल्यामुळे सभागृहाचे कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आले. सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर जयंत पाटील यांनी सभागृहाची माफी मागितली मात्र मंत्री शंभूराज देसाई यांनी केवळ माफी मागून चालणार नाही अशा पद्धतीने अध्यक्षांचा अपमान होणार असेल तर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा ही प्रथा सुरू होईल त्यामुळे निलंबनाची कारवाई करावी, अशी विनंती देसाई यांनी केली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!