अकोला : आषाढी एकादशीला हजारो भाविक पंढरपूरला येतात. भाविकांची संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून विशेष ट्रेन चालवली जात आहे. भाविकांना घेऊन रेल्वे स्थानकावर पोहोचलेल्या रेल्वेचे अकोल्यात जोरदार स्वागत करण्यात आले. प्रवाशांनी रेल्वे चालक व गार्ड यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. आषाढी एकादशीला विठ्ठल जय हरी विठ्ठलचा जयघोष करत हजारो भाविक पंढरपूरला दरवर्षी दर्शनासाठी जातात. आषाढी एकादशीला येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन रेल्वे विभागाने विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वे विभागाच्या वतीने वारकऱ्यांसाठी नागपूर ते मिरज दरम्यान विशेष गाडी चालवली जात आहे. ही गाडी २५ आणि २८ जून रोजी नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मिरजला पोहोचेल. ही गाडी २६ आणि २९ जून रोजी भाविकांना घेऊन नागपूरला परतेल. विदर्भातील भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी रेल्वे विभागाकडून व्यवस्था करण्यात आली आहे. नागपूरहून निघालेली गाडी पहाटे दीड वाजता अकोल्याला पोहोचली. रेल्वे स्थानकावर येताच डीआरयूसीसी सदस्य विमल जैन, अधिवक्ता राजनारायण मिश्रा उपस्थानक प्रबंधक गोमासे, आरपीएफचे पोलीस निरीक्षक युनूस खान, सीटीआय बडगुजर, सामाजिक कार्यकर्त्या माधुरी राकेश चौधरी, भुवन जैन यांनी ट्रेनचे जोरदार स्वागत केले. यावेळी उपस्थित वारकरी व सदस्यांनी ट्रेनच्या चालक व गार्डचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. त्यानंतर विमल जैन यांनी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.