Home » नागपूर मडगाव रेल्वेला संतनगरी शेगाव येथे थांबा

नागपूर मडगाव रेल्वेला संतनगरी शेगाव येथे थांबा

by नवस्वराज
0 comment

अकोला : विदर्भ आणि कोकण या दोन विभागांना जोडणाऱ्या नागपूर ते मडगाव रेल्वेला संत नगरी शेगाव येथे थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे नागपूर आणि कोकणातून शेगाव येथे दर्शन व पर्यटनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी सोय झाली आहे. ४ जानेवारी २०२३ पासून हा थांबा असेल.

मडगाव आणि नागपूरला जोडणाऱ्या द्वि साप्ताहिक रेल्वे फेरीला शेगाव येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत होती. यासंदर्भात मध्य रेल्वेकडे सातत्याने नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यानुसार मध्य रेल्वेने नागपूरहून सुटणाऱ्या व मडगाव येथुन सुटणाऱ्या दोन्ही रेल्वे फेऱ्यांना शेगाव येथे थांबा देण्याचे पत्र नागपूर आणि भुसावळच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना दिले आहे. हे पत्र प्राप्त होताच शेगाव येथे आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

देशभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी शेगाव येथे येत असतात. यापैकी अधिकांश प्रवासी रेल्वे मार्गाने शेगाव येथे पोहोचतात. आतापर्यंत विदर्भ आणि कोकण या प्रदेशांना जोडणारी थेट रेल्वेफेरी नव्हती. त्यामुळे मुंबईमार्गे दुसऱ्या रेल्वेने प्रवास करावा लागत होता. नागपूर मडगाव ही थेट रेल्वे फेरी सुरू झाल्याने नागपूर येथून कोकणात जाणे व कोकणातून थेट विदर्भात येणे सोपे झाले होते. या रेल्वेला शेगाव येथे आता थांबा मिळाला आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!