वर्धा : राज्य परिवहन महामंडळाच्या तीन बसेसच्या अपघातात १७ प्रवासी जखमी झालेत. १० मे २०२३ रोजी हा अपघात वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात असलेल्या जंगलापूर फाट्याजवळ घडला. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
राज्य परिवहन महामंडळाची एक बस रस्त्याच्या कडेला नादुरूस्त अवस्थेत थांबली होती. या बसमधील प्रवासी दुसऱ्या बसमध्ये चढत होते. ज्या बसमध्ये प्रवासी चढत होते ती नागपूरवरुन दिग्रसकडे जात होती. याच दरम्यान देगलूर ते नांदेड बसच्या दोन्ही बसेसला चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. ओव्हरटेक करताना चालकाचा अंदाज चुकल्याने देगलूर-नांदेड बस दोन्ही थांबलेल्या बसवर आदळली. यात प्रवाशांना दुखापत झाले. यात बस चालक बालाजी कांबळे यांना जबर मार बसला.
अपघात घडला त्यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर या मार्गाने जात जात होते. त्यांनी तातडीने आपले वाहन थांबवून जखमींना आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली. डॉ. भोयर यांनी बस चालक कांबळे व काही जखमींना आपल्या वाहनातून सेलू येथे आणले. त्यानंतर त्यांना सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. एकाच वेळी महामार्गावर तीन बसेसचा अपघात घडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठत काहींच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला केली, त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरू झाली. जखमींमध्ये बहुतांश प्रवासी नागपूरचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.