Home » विदर्भातील अनुशेषाचा मुद्दा विधान परिषदेत गाजला

विदर्भातील अनुशेषाचा मुद्दा विधान परिषदेत गाजला

by नवस्वराज
0 comment

मुंबई : विदर्भातील उद्योगाच्या अनुशेषाचा मुद्दा सोमवार, २२ ऑगस्ट २०२२ रोजी विधान परिषदेत गाजला. आमदार अभिजित वंजारी, आमदार डॉ. रणजित पाटील, आमदार प्रवीण दटके, आमदार डॉ. परिणय फुके यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांचे विदर्भातील उद्योग क्षेत्राकडे लक्ष वेधले.

विदर्भातील अनुशेषावर विधान परिषदेत चर्चेदरम्यान आमदार अभिजित वंजारी यांनी विदर्भात येणाऱ्या उद्योगांना गुंतवणुकीवर सवलत देण्याची मागणी केली. आमदार डॉ. परिणय फुके यांनी औद्योगिक वसाहतींमधील रिक्त प्लॉटकडे लक्ष वेधले. विदर्भातील उद्योगांना नव्याने वीज सवलत देण्याची मागणी केली. देवरी एमआयडीसीच्या मुद्द्यावर तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली. आमदार प्रवीण दटके यांनी मिहानच्या मुद्द्यावर चर्चा करताना आयटी आणि फुड इंडस्ट्रीच्या प्रश्नावर कार्यवाहीची मागणी केली. बायोफ्युएलसाठी उद्योगांबाबत सरकारने धोरण ठरवावे, असे ते म्हणाले. एक रुपया लिटर सबसिडी या उद्योगांना देण्याची मागणी त्यांनी केली.

आमदार डॉ. रणजित पाटील यांनी अमरावती विभागातील उद्योगांचा मुद्दा उचलला. अकोल्यात दाल मिल उद्योग आहे. अशाच पद्धतीने अमरावती विभागातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कौशल्य विकास विभाग व उद्योग विभागाने एकत्र येत प्रशिक्षण द्यावे, असे ते म्हणाले. कोल्ड स्टोअरेजला चालना मिळावी व त्यासाठी सरकारने पावले उचलावी, असे त्यांनी नमूद केले.

चर्चेला उत्तर देताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नागपुरात विशेष बैठक घेण्याचे आश्वासन दिले. नागपुरच्या बैठकीत विदर्भातील नव्या उद्योग धोरणाची दिशा ठरविण्यात येईल, असे ते म्हणाले. येत्या १५ दिवसांत आढावा घेत औद्योगिक वसाहतींमधील रिकाम्या जागाही ताब्यात घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भात येणाऱ्या उद्योगांना सबसिडीचे धोरण राज्य सरकार ठरवेल असे ते म्हणाले. स्थानिकांना उद्योगांमध्ये किती रोजगार मिळत आहे, याचा आढावाही सरकार घेईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!