अकोला : खारपाणपट्ट्यातील ६९ गावांच्या पाणी प्रश्नावर उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी संघर्ष पदयात्रा काढली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करीत त्यांनी ही यात्रा अकोल्यापासून नागपूरपर्यंत पायी काढली आहे.
अकोल्यापासून सोमवारी निघालेली ही पदयात्रा पायीच नागपुरातील देवेंद्र फडणवीस यांच्या घरापर्यंत पोहोचणार आहे. त्यानंतर देशमुख हे फडणवीस यांना खारपाणपट्ट्यातील खारे पाणी पिण्याठी देणार आहेत. सध्या ही यात्रा मूर्तिजापूर तालुक्यातील चिंचखेड फाट्यापर्यंत पोहोचली आहे.
‘नवस्वराज’ने नागपूर आणि अकोला येथुन नितीन देशमुख यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी ही यात्रा चिंचखेड फाट्यावरून पुढे निघाली होती. मूर्तिजापूर आणि अकोला जिल्ह्याचे तापमाना गुरुवारी ३८ अंश सेल्सिअसच्या आसपास होते. अशातही देशमुख आणि त्याचे सहकारी पायी चालतच आहेत. डोक्यावर तळपता सूर्य आणि पायाखाली तापलेला डांबरी रस्ता असा प्रवास आमदार देशमुख आणि त्यांच्या सहकार्यांचा सुरू आहे. कडक उन्हामुळे एकाच पल्ल्यात लांब अंतर पार करणे नितीन देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी अवघड होत असेल तरी त्यांचे ‘हौसले बुलंद’ दिसत आहे.
यात्रा सुरू झाल्यापासून आतापर्यंत जेमतेम मूर्तिजापूरपर्यंतचा रस्ता संघर्ष यात्रेने पार केला आहे. अशात १६ एप्रिलपर्यंत पाऊस आणि वादळाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे नागपूरपर्यंतचा जास्तीत जास्त पल्ला ऊन कमी झाल्यानंतर गाठता यावा असा प्रयत्न संघर्ष यात्रेतील आमदार नितीन देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आहे. हा प्रयत्न जरी असला तरी ऊन्हाळ्याच्या दिवसामुळं उष्माघाताचा धोका या संघर्षयात्रेपुढे आव्हान म्हणून आहेच.