Home » यशोमती ठाकूर टाकणार राणांवर अब्रुनुकसानीचा दावा

यशोमती ठाकूर टाकणार राणांवर अब्रुनुकसानीचा दावा

by Navswaraj
0 comment

अमरावती : लोकसभा निवडणूक काळात आपल्याकडुन पैसे घेतल्याच्या खासदार नवनीत राणा यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिल्यानंतर अॅड. ठाकूर यांनी राणा यांच्या विरोधात १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. लॉ शाखेच्या पदवी संपादन करणाऱ्या अॅड. ठाकूर यांना कायद्याचा अभ्यास आहे. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी ‘क्रिमिनल आॅफेन्स’ कारवाई करण्याची तयारी चालविली आहे.

अॅड. ठाकूर यांनी आपल्याकडुन पैसे घेतले व दुसऱ्याचा प्रचार केल्याचा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला. नवनीत राणा व रवी राणा दाम्पत्याने अमरावतीमधील राजकीय वातावरण बिघडविल्याचा आरोप करीत अॅड. ठाकूर म्हणाल्या की, या दाम्पत्याने निवडणूक काळात मर्यादेपेक्षा जास्त रक्कम खर्च केली आहे. हा प्रकार न दिसणारा निवडणूक विभाग झोपलाय का असा प्रश्नही त्यांनी केली. राणा यांनी निवडणूक काळात पैसे वाटप केल्याची एकप्रकारे स्वत: कबुलीच दिली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगासह ईडीनेही त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही आमदार अॅड. ठाकूर यांनी केली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आमदार अॅड. ठाकूर यांनी टीका केली. फडणवीस राणा दाम्पत्याला पाठीशी घालत आहेत. ज्या दहीहंडी कार्यक्रमासाठी फडणवीस अमरावतीत आले होते, त्या कार्यक्रमाला अभिनेत्री शिल्पा शेट्टी उपस्थित होती. या त्याच शिल्पा शेट्टी आहेत, ज्यांच्या पतीने ‘ब्लू फिल्म’ बनविल्या. अशा लोकांना राणा दाम्पत्य उत्सवांसाठी बोलवत असेल आणि त्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारखे नेते उपस्थित राहात असतील तर विचार करणे गरजेचे आहे, असेही आमदार अॅड. ठाकूर म्हणाल्या.

राणा यांनी केलेले आरोप हे ‘क्रिमिनल आॅफेन्स’ आहेत. त्यामुळे आपण त्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा सज्जड दम आमदार अॅड. ठाकूर यांना दिला. राणा दाम्पत्याच्या पापाचा घडा आता भरला आहे. त्यांच्यावर आपण निश्चित अब्रुनुकसानीचा दावा टाकणार आहोत, असे त्या म्हणाल्या. राणा दाम्पत्य आणि अॅड. ठाकूर यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना राणा यांच्या विरोधकांनी एकत्र येत त्यांना घेरण्याची तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र राज्यात व केंद्रात सत्तेत असलेले भाजप सरकार सध्या राणा यांच्या पाठीशी असल्याने विरोधक राणांवर कसे हल्ले करतील व त्यातून राणांना फायदा होईल की नुकसान हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

error: Content is protected !!