Home » आमदार नितीन देशमुख म्हणाले, माझा अध्यक्षांवर विश्वासच नाही

आमदार नितीन देशमुख म्हणाले, माझा अध्यक्षांवर विश्वासच नाही

by Navswaraj
0 comment

अकोला : शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गट विरुद्ध एकनाथ शिंदे गटात सत्तासंघर्ष अद्यापही कायम आहे. सत्तासंघर्षाचे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुनावणी सुरू झाली आहे. मात्र ठाकरे गटाने अध्यक्षांवरही विश्वास नसल्याचे स्पष्ट केले आहे.

बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख यांनी याबाबत मोठे विधान केले आहे. आपला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर विश्वास नसल्याचा खुलासा केला आहे. नार्वेकर हे केवळ वेळकाढुपणा करीत असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. सत्तासंघर्षाचा खटला निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सूचना दिल्यानंतरही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जे करीत आहेत, ते घटनाबाह्य असल्याचे आमदार देशमुख म्हणाले. व्हिप कुणाचा असावा, अध्यक्ष कुणाचा असावा, गटनेता, प्रतोद याबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. विधानसभा अध्यक्षांना केवळ निर्णय द्यायचा आहे. कोर्टाने स्पष्ट दिशानिर्देश दिल्यानंतरही नार्वेकर वेळ वाया घालवत असल्याने त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न आमदार देशमुख यांनी उपस्थित केला. ठाकरे गटाला आता कोणत्याही प्रकारची मागणी मांडायची नाही. विधानसभा अध्यक्षांनी आता तातडीने आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय देणे अपेक्षित आहे. मात्र अध्यक्षच अशी भूमिका घेत असतील तर हा संपूर्ण प्रकार महाराष्ट्राच्या जनतेशी विश्वासघात असल्याची टीकाही आमदार नितीन देशमुख यांनी केली.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर सर्व आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. त्यावेळी अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख हे एकटेच परतले. आपले अपहरण करून सोबत नेण्यात आले व आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा सनसनाटी आरोप आमदार देशमुख यांनी त्यावेळी केला होता. राज्यातील सत्तासंघर्षाच्या मुद्द्यावर आता विधानसभा अध्यक्षांपुढे सुनावणी सुरू झाली आहे. शिवसेनेतील शिंदे गटाच्या ४० आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांबाबत ही सुनावणी आहे. निवडणूक आयोगाने यापूर्वीच शिंदे गटाला शिवसेनेचे अधिकृत चिन्ह व पक्ष मान्यता दिली आहे. अशात सुनावणीच्या पहिल्या दिवशी उद्धव ठाकरे गट व एकनाथ शिंदे गट यांना पुरावे व प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन आठवड्यांची मुदत दिली. ही मुदत देण्यात आल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

error: Content is protected !!