अमरावती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतच्या जाहिरातीवर टीका करताना अमरावतीचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी ‘बेडूक कितीही फुलगा तरी तो हत्ती होऊ शकत नाही’, असे वक्तव्य केले होते. डॉ. बोंडे यांच्या या वक्तव्याचा बच्चू कडु यांनी समाचार घेतला आहे.
डॉ. अनिल बोडेंसारख्या माणसाने असे बोलणे चुकीचे आहे. त्यांनी किमान आपली लायकी पाहून तरी बोलले पाहिजे. बच्चू कडू म्हणाले, आपण कोणामुळे कुठे आहोत. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. बेडूक हत्ती होऊ शकत नाही, अशा प्रकारची वक्तव्ये करु नये. सध्या सर्वत्र अक्कल नसल्यासारखे बोलणे सुरू आहे. डॉ. बोंडेंना केंद्रात अडचणी येत असतील म्हणून इकडे काहीतरी बोलण्याचा प्रकार सुरू आहे. एकत्र असूनही मुख्यमंत्री शिंदे यांना अशा पद्धतीने बोलत असतील तर ते चुकीचे आहे.
मुख्यमंत्र्यांचा प्रभाव सध्या वाढतोय. त्यांच्या प्रसिद्धीवर, त्यांच्या चांगुलपणावर अशा पद्धतीने व्यक्तव्य केली जात असतील तर ते चुकीचे आहे. भाजपा अशा पद्धतीने एखाद्या पक्षाला सोबत घेऊन हळूहळू कमी करण्याचा तर प्रयत्न करत नाही ना? असा प्रश्न बच्चू कडू यांनी यावेळी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेला कुठेतरी ग्रहण लावण्याचा प्रयत्न होतोय असे वाटतेय. परंतु हे लोकांना समजले तर लोक फार पुढे जातील. आमदार बच्चू कडू पुढे म्हणाले, डॉ. बोंडे जे काही बोलतायत, हे म्हणजे आपल्याच माणसाला बोलल्यासारखे आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची तुलना करणे योग्य नाही. देवेंद्र फडणवीस यांचे काम करण्याची पद्धत वेगळी आहे आणि शिंदेंची वेगळी आहे, असेही कडू म्हणाले.