Home » परब, राऊतांमुळे ठाकरेंचे गलत कदम और सल्तनत खतम

परब, राऊतांमुळे ठाकरेंचे गलत कदम और सल्तनत खतम

by नवस्वराज
0 comment

नागपूर : उद्धव ठाकरे यांना आमदार अनिल परब आणि खासदार संजय राऊत धादांत चुकीचे सल्ले देतात. त्यांच्या चुकीच्या सल्ल्यांमुळेच ठाकरेंचे सर्व निर्णय चुकले. भाजपसोबतची युती तोडून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत अनैसर्गिक युती करून सत्ता स्थापन केली. हा निर्णय शिवसेनेतील अनेकांना पटला नव्हता. आम्ही अनेक आमदारांनी ठाकरे यांना वारंवार माहिती दिली, मात्र त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले. ते केवळ परब आणि राऊत यांचे ऐकत राहिले. याच निर्णयांमुळे ठाकरे यांच्यावर आज सत्ता गमाविण्याची वेळ आली आहे, असे शिवसेना आमदार आशिष जयस्वाल यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी सहकाऱ्यांशी चर्चा केली नाही. अनुभवी लोकांचा सल्ला घेतला नाही. गटनेते एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई आणि घाईत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना त्यांनी चुकीच्या लोकांचा सल्ला घेतला. कायदेशीर सल्ला घेतलाच नाही. चुकीच्या माणसांचे सल्ले ऐकल्यामुळे ठाकरेंची सत्ता गेल्याचे जयस्वाल म्हणाले. महाविकास आघाडी ही अनैसर्गिक युती आहे. ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपाशी युती तोडली. महाविकास आघाडीतून बाहेर पडू असे आम्ही वारंवार ठाकरेंना सांगत होतो. मात्र ठाकरेंचे सल्लागार कुठल्याही परिस्थितीत आघाडीतून बाहेर पडायचे नाही, असे सांगत होते. सातत्याने घेत गेलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे ‘गलत कदम और सल्तनम खतम’अशी वेळी आता आली आहे.

ठाकरे यांनी कोणताही अभ्यास न करता केवळ निर्णय घेतले. एकनाथ शिंदे यांनी पूर्ण अभ्यास करून निर्णय घेतले. ठाकरे यांनी अभ्यास करून निर्णय घेतले असते तर आमचे बंड फेल गेले असते असेही आमदार जयस्वाल म्हणाले. शिंदे यांना गटनेता पदावरून काढण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आलेला नाही. ठाकरे यांनी आधी परब आणि राऊत नावाचे दोन सल्लागार दूर करावे अशी मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. आता एकनाथ शिंदे गटात असलेल्या अनेक आमदारांचेही तेच म्हणणे आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!