Home » आमदार मिटकरी म्हणतात; शिंदे साहेब फडणवीसांच्या नादी लागू नका

आमदार मिटकरी म्हणतात; शिंदे साहेब फडणवीसांच्या नादी लागू नका

by नवस्वराज
0 comment

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सतर्कतेचा ईशारा दिला आहे. राज्यात जे चालवले ते बरे नाही शिंदे साहेब. फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य अधोगतीकडे नेत आहात, असे म्हणत आमदार मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करीत म्हटले आहे की, शिंदे सरकारला 35 दिवस पूर्ण झाले आहेत. राज्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा कॅबिनेटविना एकहाती सरकार राज्यात सुरू आहे. या खेळात मात्र सामान्य जनता होरपळत आहे. आणखी एक ट्विट करत आमदार मिटकरी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, संघराज्यामध्ये राज्यपालांचा सहभाग महत्त्वाचा व राज्यपालांची भूमिका महत्त्वाची, असे घटना तज्ज्ञांचे मत असले, तरी महाराष्ट्राच्या राज्यपालांना संघराज्य म्हणजे “रेशीमबाग” असेच वाटत असावे, म्हणून ते संघाला पोषक असे वागतात. राज्यपालांनी भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करायला वेळ काढावा, असा टोलाही त्यांनी लगावला.

माध्यमांशी बोलताना आमदार मिटकरी यांनी ‘हर घर तिरंगा’ या भाजपच्या मोहिमेवर टीका केली. ते म्हणाले की, महाराष्ट्रात अनेक समस्या आहेत. शिंदे सरकार आल्यापासून राज्यात संपूर्ण महाराष्ट्र विविध समस्यांनी होरपळून निघाला आहे. अजून महाराष्ट्राला कृषिमंत्री नाही. दुसरीकडे ही बोगसबाजी सुरू आहे. तिरंग्याच्या नावावरदेखील व्यवसाय करता येते हे भाजपने दाखवून दिले. जसे हे वारंवार राज्यघटनेचा अपमान करतात, तसेच हे राष्ट्रध्वजाचा अपमान करीत आहेत. ‘आरएसएस’ला देशाचा ध्वज मान्य नाही आणि हे लोक जर आता ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवत देशभक्ती शिकवायला लागले असतील, तर हे नथुराम गोडसेच्या हातून महात्मा गांधींची पूजा करण्यासारखे आहे. त्यामुळे भाजपसारख्या देशविघातक पक्षापासून जनतेने सावध रहावे, असे ते म्हणाले.

error: Content is protected !!