नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या समस्या सोडविण्यासाठी व मत्सव्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्रीय मत्स्य व्यवसाय व पशू संवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला तसेच महाराष्ट्राचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात दोन तास बैठक झाली.
बैठकीदरम्यान मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय, मच्छीमारांच्या समस्या आदींकडे केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधले. केंद्र सरकारच्या पुढाकाराने देशभरात सागर परिक्रमा उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातही हा परिक्रमा उपक्रम राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याला ७२० किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. अशात मत्स्यव्यवसाय, मत्स्य उत्पादकांना व मच्छीमारांना किसान क्रेडिट कार्डासह केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ कसा देता येईल, यावरही रुपाला आणि मुनगंटीवार यांच्यात चर्चा झाली.