Home » अखिल भारतीय ग्राहक पंचायतची ऑनलाईन सदस्य नोंदणी सुरू

अखिल भारतीय ग्राहक पंचायतची ऑनलाईन सदस्य नोंदणी सुरू

by Navswaraj
0 comment

अकोला : दिवंगत बिंदूमाधव जोशी, राजाभाऊ पोफळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९७४ मध्ये स्थापन केलेल्या अखिल भारतीय ग्राहक पंचायतची ऑनलाईन सदस्य नोंदणी सुरू झाली आहे.

ही संघटना देशातील सर्व राज्यांमधे ग्राहकांच्या न्याय हक्कांसाठी निस्वार्थपणे लढा देते. ग्राहक असंघटीत असल्याने सर्वांत जास्त पिळल्या जातो. त्याला संघटीत करून, न्याय हक्क व कर्तव्यांबाबत जागृत करणे, सक्षम व स्वावलंबी करणे, भोगवाद आणी चंगळवादापासून परावृत्त करून, शोषणमुक्त समाजाची निर्मिती करणे हे या संघटनेचे ध्येय आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतने राष्ट्रोथ्थानाच्या कार्याचे व्रत स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणेने स्वीकारले आहे.

ग्राहक पंचायतची कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी नाही. शासकीय अनुदान देखील संघटना स्वीकारत नाही. शिस्त, शिष्टाचाराचे पालन करणाऱ्या संस्कारी आणि निस्वार्थ कार्यकर्त्यांमुळेच संघटनेचे सेवाकार्य अविरतपणे सुरू आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत व्यापाऱ्यांच्या विरोधात नाही. अनुचित व्यापार पद्धतीला आळा घालून ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे हा संघटनेचा मूळ उद्देश आहे. उत्पादनात वाढ, वितरणात समानता, उपभोगावर संयम ही ग्राहक चळवळीची त्रिसूत्री आहे. शोषणमुक्त, भ्रष्टाचारविरहित, नैतिक मूल्याधिष्ठीत समाजरचना ही संकल्पना आहे.

१९८६ मध्ये पारित झालेल्या ग्राहक संरक्षण कायद्याचे प्रारूप ग्राहक पंचायतच्या कार्यकर्त्यांनी बनवले होते. २०१९ मध्ये ग्राहक संरक्षण कायद्यात जे व्यापक संशोधन झाले, ते संघटनेच्या सततच्या पाठपुराव्यामुळेच. वस्तूंवरील अधिकतम खुर्दा मूल्य (एमआरपी) रद्द करून उत्पादन मूल्य छापावे, संपूर्ण देशात एकच कर प्रणाली असावी, खासगी शिक्षण संस्था व कोचिंग क्लासेसवर नियंत्रण आणावे, डोनेशनशिवाय विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळावा, टोलटॅक्स रद्द करावा या अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या काही प्रमुख मागण्या आहेत.

ग्राहक पंचायतचे १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ऑनलाईन वार्षिक सदस्यता नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. नागरीकांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सदस्य होऊन कार्याला हातभार लावावा, असे आवाहन अकोला जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विजय केंदरकर व मिलिंद गायकवाड यांनी केले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!