अकोला : गणेश मिरवणुकीत झेंड्याचा वीजेच्या जीवंत वाहिनीला स्पर्श होऊन युवकांचा मृत्यू झाल्याचा व्हिडीओ सोशल माध्यमावर व्हायरल झाला. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन मार्गावरील मधुन जाणाऱ्या वीज वाहिन्यांची पाहणीचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले. परंतु अतिहुशार प्रशासनाने वीज तारांपेक्षाही उंच असलेल्या केबल आणि इंटरनेटच्या वायर कापत सामान्य अकोलेकरांना वेठीस धरले. विशेष म्हणजे प्रशासनाच्या या मनमानीबद्दल अकोल्यातील एकाही लोकप्रतिनिधीला माहितीदेखील नव्हते.
गुरुवारी रात्रीच्या अंधारात ही पाहणी करण्यात आली. बऱ्याच वायर कापण्यात आल्या. शासकीय मालमत्तेवर तसेच कमी उंचीवर बांधलेल्या मिरवणुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वायर कापल्यास बाब समजुन येते. परंतु खासगी मालमत्तांवर तसेच ३० फुटांपेक्षाही उंचीवर असलेल्या केबल टीव्ही आणि इंटरनेटच्या वायर कापण्याचे कारण अनाकलनीय आहे. कारवाई पेक्षा, कारवाईचा देखाव्याला जास्त महत्त्व आहे. मिरवणूक मार्गावरील रस्त्याच्या मधुन जाणाऱ्या तसेच ज्यामुळे नागरीकांच्या जीवाला धोका होऊ शकतो, अशा बऱ्याच वायर मात्र कारवाईदरम्यान तशाच ठेवण्यात आल्या आहेत. महानगरात अनेक समस्यांना नागरीकांना दररोज सामोरे जावे लागते. प्रशासनाने अशी कारवाई फक्त सणासुदीला न करता कायम करावी, अशी अनेक समस्याग्रस्त नागरीकांची मागणी आहे.