Home » भारतीय सैन्यात मराठीचा पुन्हा डंका

भारतीय सैन्यात मराठीचा पुन्हा डंका

ले.जन. मनोज पांडे लष्कर प्रमुख झाल्याने नागपुरात आनंद

by Navswaraj
0 comment

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांना नवे लष्करप्रमुख करण्याचा निर्णय घेतला आहे. जनरल पांडे हे मूळ महाराष्ट्राच्या नागपूरचे रहिवासी आहेत. पांडे यांच्या रुपाने भारतीय सैन्यदलात चवथ्या मराठी अधिकाऱ्याचा डंका निर्माण झाला आहे. १ मे २०२२ रोजी ते हा पदभार स्वीकारतील.

मूळ नागपूरकर असलेले पांडे डिसेंबर १९८२ला राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) व त्यानंतर इंडियन मिलिटरी अकादमीमार्फत (आयएमए) लष्करात अधिकारी झाले. पांडे पूर्व कमांडचे प्रमुख होते. पूर्व कमांडमध्ये संपूर्ण ईशान्य भारताचा समावेश होतो. १ फेब्रुवारीला त्यांनी लष्कराचे ४३वे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्यावेळी ते लष्करातील सर्वाधिक ज्येष्ठ अधिकारी असल्याने प्रमुख होतील, असे सांगण्यात येत होते.लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे हे ३० एप्रिल २०३३ रोजी निवृत्त होत आहेत. १ मे २०२२ रोजी पांडे पदभार स्वीकारतील.

सध्याचे लष्करप्रमुखदेखील मराठीच असल्याने सलग दुसऱ्यांदा मराठी अधिकाऱ्याला लष्करी दलाचे प्रमुख होण्याचा मान पहिल्यांदाच मिळत आहे. याआधी गोपाळ गुरूनाथ बेवूर (१६ जानेवारी १९७३ ते ३१ मे १९७५) व अरुणकुमार वैद्य (१ ऑगस्ट १९८३ ते ३१ जानेवारी १९८६) हे मराठी अधिकारी लष्करप्रमुख झाले होते. आता लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे चवथे मराठी अधिकारी लष्करप्रमुखपदी विराजमान होत आहेत. उपप्रमुखांचा विचार केल्यास, लेफ्टनंट जनरल पांडे यांच्याआधी ४२पैकी फक्त दहा अधिकाऱ्यांना लष्करप्रमुख होता आले आहे, हे विशेष.

 

‘इंजिनीअर्स’ला प्रथमच संधी
लष्करात ‘लढाऊ आर्म’ व ‘सेवा आर्म’ असे दोन भाग असतात. पायदळ, रणगाडा व तोफखाना हे तीन प्रमुख लढाऊ आर्म असतात. या जोडीलाच ‘इंजिनीअर्स’देखील युद्धस्थितीत किंवा संकटसमयी सीमेवर उभे राहून शत्रूचा सामना करतात. त्यामुळेच ‘इंजिनीअर्स’ हेदेखील ‘लढाऊ आर्म’ गणले जातात. लष्करात आजवर २७ पैकी २२ प्रमुख हे पायदळातील होते. या स्थितीत ‘इंजिनीअर्स’ना पहिल्यांदाच ही संधी मिळाली आहे.

वैदर्भीय शिरपेचात मानाचा तुरा
अतिविशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित झालेले मनोज पांडे कन्सल्टिंग सायकोथेरपिस्ट आणि नागपूर विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाचे सेवानिवृत्त प्रमुख सी. जी. पांडे आणि दिवंगत प्रेमा पांडे यांचे सुपूत्र आहेत. त्यांच्या आई प्रेमा ‘ऑल इंडिया रेडिओ’त निवेदिका होत्या. मनोज पांडे यांचे धाकटे बंधू संकेत हे देखील भारतीय लष्करात होते. ते कर्नल म्हणून निवृत्त झाले होते. त्यांच्या पत्नी अर्चना ह्या गृहिणी आहेत. मुलगा फ्लाईट लेफ्टनंट अक्षय भारतीय हवाई दलात वैमानिक आहे.

भव्यदिव्य ‘पराक्रम’
डिसेंबर २००१ मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, ऑपरेशन पराक्रमचा भाग म्हणून पश्चिम सीमेवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि सैन्य तैनात करण्यात आले होते. ही घटना घडली तेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची परिस्थिती होती. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी जम्मू आणि काश्मीरमधील ऑपरेशन पराक्रम दरम्यान नियंत्रण रेषेजवळ इंजिनियर रेजिमेंटचे नेतृत्व केले. यासह, त्यांनी पश्चिम सेक्टरमध्ये एक अभियंता ब्रिगेड, नियंत्रण रेषेजवळ पायदळ ब्रिगेड आणि पश्चिम लडाखच्या उच्च उंचीच्या भागात एक हिल डिव्हिजन आणि ईशान्येकडील एका कॉर्प्सचे नेतृत्व केले.

error: Content is protected !!