अकोला : भोंग्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर त्यांनी काढलेले आदेश पत्रक अकोल्यात पोहोचले आहे. अकोल्यातील प्रत्येक घरात हे पत्र पोहोचेल अशी तयारी अकोल्यातील मनसे नेते पंकज साबळे यांनी केली आहे. आजपासून या पत्राच्या वितरणास सुरूवात झाली आहे.
राज ठाकरे यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले होते. हे पत्रक घरोघरी पोहोचवावे, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले होते. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसैनिकांनी घरोघरी जाऊन हे पत्रक वाटायला सुरुवात केली. पोलिसांनी पत्रक वाटणाऱ्या मनसे सैनिकांवर कारवाई करण्यास राज्यभरात सुरूवात केली आहे, अशात आता राज यांचे आदेश पत्र अकोल्यात पोहोचले आहे. प्रत्येक मनसे कार्यकर्त्यांशी संपर्क साधत हे पत्रक त्यास सोपविण्यात येत आहे. कार्यकर्ते हे पत्रक घरोघरी पोहोचविणार आहेत.
राज ठाकरेंच्या पत्रकात नेमकं काय?
राज ठाकरे यांनी गेल्या महिन्यात पुण्यात सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी सांगितलं होतं की ते भोंगे प्रकरणावर एक पत्र लिहिणार आहेत आणि ते पत्र मनसैनिकांनी संपूर्ण राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवायचंय असंही त्यांनी सांगितलं होतं. त्याच पत्राबाबत त्यांनी गुरुवारी एक ट्विट करत मनसैनिकांना आदेश दिले होते.
१. जिथे-जिथे आवाजाच्या नियमाचे पालन होत नसेल तिथे-तिथे तुम्ही स्वाक्षरी मोहीम राबवून स्थानिक पोलिसांना कळवावे.
२. लाऊडस्पीकरच्या आवाजाचा त्रास झाल्यास तुम्ही घरातूनच स्वतःच्या मोबाईलवरून १०० क्रमांक डायल करून पोलिसांना सतत माहिती देऊ शकता.
३. माझं हे पत्र घेऊन तुमच्या घरी येणारा माझा जो महाराष्ट्र सैनिक आहे, त्याचं नाव आणि मोबाईल क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. कोणत्याही संकटात, अडीअडचणीच्या वेळी माझा हा महाराष्ट्र सैनिकच तुमच्यासाठी धावून येईल.