Home » हुंडीवाले हत्याकांडातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फुटला

हुंडीवाले हत्याकांडातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फुटला

by Navswaraj
0 comment

अकोला : किसनराव हुंडीवाले यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फुटला आहे. अॅड. तुळशीदास उर्फ संतोष भोरे हे फुटलेल्या साक्षीदाराचे नाव असून विशेष सरकारी वकिल अॅड. उज्ज्वल निकम यांनी त्यांची उलटतपासणी सुरू केली आहे. महाराष्ट्र गवळी समाजाचे नेते किसनराव हुंडीवाले यांची ६ मे २०१९ रोजी सकाळी पावणे बाराच्या सुमारास धर्मदाय आयुक्त कार्यालयामध्ये हत्या झाली होती.

विक्रम ऊर्फ छोटू श्रीराम गावंडे, श्रीराम कसदन गावंडे, रणजित श्रीराम गावंडे, प्रवीण श्रीराम गावंडे, धीरज प्रल्हाद गावंडे, सूरज प्रल्हाद गावंडे, श्रीराम कसदन गावंडे, मंगेश श्रीकृष्ण गावंडे, सतीश सुखदेव तायडे, विशाल शंकर तायडे, मयूर गणेशलाल अहिर, दिनेश राजपूत (ठाकूर), प्रतीक दत्तात्रय तोंडे व मोहम्मद साबीर यांनी हा खून केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या न्यायालयात खटला सुरू आहे. याच प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेले आरोपी श्रीराम गावंडे यांचे वकील ॲड. तुळशीदास उर्फ संतोष सारंगधर भोरे यांची साक्ष नोंदविण्यास सुरुवात झाली. परंतु त्यांचे पोलिसांनी नोंदविलेले बयाण आणि न्यायालयात सुरू असलेली साक्ष यामध्ये प्रचंड तफावत आढळून आली.

विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेले ॲड. भोरे यांना फितूर घोषित करीत त्यांची उलटतपासणी घेण्यास सुरुवात केली. गुरुवारी दुपारपर्यंत उलटतपासणी झाली. उर्वरित उलटतपासणी ही शुक्रवारी घेण्यात आली. या प्रकरणात विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांच्यासोबत सरकारी वकील आर.आर. देशपांडे हे काम बघत आहेत. न्यायालयात गुरुवारी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ॲड. संतोष भोरे यांना फितूर घोषित करताच विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्ज्वल निकम यांनी त्यांची उलटतपासणी करण्यास सुरुवात केली. यावेळी सहकारी म्हणून ॲड. नरेंद्र धुत यांची मदत घेतली. ते धर्मदाय आयुक्त कार्यालयात झालेल्या घटनाक्रमाबाबत माहिती देत असता बचावपक्षाचे वकील ॲड. सोमनाथ लढ्ढा यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे दोन्ही पक्षातील वकिलांमध्ये न्यायालयात चांगलीच खडाजंगी झाली. त्यामुळे उलटतपासणी अर्धवट राहिली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!