Home » गडकरींना धमकी देणाऱ्या नरेशकडे माजी डेप्यूटी सीएमची सुपारी

गडकरींना धमकी देणाऱ्या नरेशकडे माजी डेप्यूटी सीएमची सुपारी

by नवस्वराज
0 comment

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कुख्यात जयेश पुजारी उर्फ शाहीर शाकीर शाह उर्फ कांथा (वय, ३५ वर्ष रा. मंगलोर, कर्नाटक) याला कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते ईश्वरअप्पा यांच्या हत्येची सुपारी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे.

जयेश ऊफ शाकीर ऊर्फ कांथा याने यासाठी एका शूटरला नेमल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कांथाने दिलेल्या माहितीमुळे नागपूरसह कर्नाटक पोलिसांनाही धक्का बसलाय. त्यांनी ईश्वरअप्पा यांच्या सुरक्षेत वाढ केलीय. केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या खामल्यातील जनसंपर्क कार्यालयात १०० कोटींची खंडणी व घातपात घडविण्याची धमकी दिल्याप्रकरणात सध्या कांथा हा धंतोली पोलिसांच्या कोठडीत आहे. पोलिस त्याची कसून चौकशी करीत असताना अनेक धक्कादायक खुलासे होत असल्याने आयबी, एनआयए, सीबीआय व कर्नाटक पोलिसही सतर्क झाले आहेत. सर्वच तपास यंत्रणांनी त्याच्या चौकशीला सुरुवात केली आहे.

बेळगाव कारागृहात कांथाची दहशतवादी संघटना पीएफआय व लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांच्या सदस्यांची ओळख झाली. या संघटना कांथासह अन्य सदस्यांना कारागृहात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पैशांचा पुरवठा करतात. याचदरम्यान दोन्ही संघटनांनी ईश्वरअप्पा यांच्या हत्येची सुपारी कांथाला दिली. त्यानुसार कांथाने गोळ्या झाडून ईश्वरअप्पा यांच्या हत्येचा कट आखला. यासाठी कारागृहातील त्याच्या खास विश्वासूला जामिनावर बाहेर काढले. तो जामिनीवरून सुटताच त्याला अत्याधुनिक शस्त्रेही उपलब्ध करून दिली. कांथाने ईश्वरअप्पा यांच्या हत्येची सुपारी घेतल्याच्या माहितीला विश्वसनीय सूत्रांनी दुजोरा दिला आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!