Home » नितीन गडकरींना धमकी देणाऱ्या जयेश पुजाराला नागपुरात आणले

नितीन गडकरींना धमकी देणाऱ्या जयेश पुजाराला नागपुरात आणले

by Navswaraj
0 comment

नागपूर : केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयाला वारंवार धमकी देणाऱ्या गँगस्टर जयेश पुजाराला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. जयेशला घेऊन नागपूर पोलिस नागपूर शहरात दाखल झाले आहे. गॅंगस्टर जयेश पुजाराने १४ जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून धमकी दिली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात नितीन गडकरींच्या कार्यालयात खंडणीसाठी फोन केला होता. या प्रकरणात नागपूर पोलिसांनी युद्धपातळीवर सूत्रे हलवीत तपास सुरू केला. जयेशने कारागृहातून हा प्रकार केल्याचे पुढे आले आहे.

जानेवारीमध्ये केलेल्या फोनवर १०० कोटी रुपयांची खंडणी जयेश पुजाराने मागितली होती. नंतर केलेल्या फोन मध्ये १० कोटी रुपये गुगल पे करायचे सांगण्यात आले होते. या प्रकरणात कर्नाटकातल्या बेळगावमधील हिंडलगा सेंट्रल जेलमध्ये असलेल्या जयेश पुजाराने फोन केल्याचे तपासात पुढे आले होते. सेंट्रल जेलमधून हे फोन केल्याचेही पुढे आले होते. खुनाच्या एका प्रकरणात आरोपी जयेश पुजाराला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यानंतरही तो कारागृहातून फोन करीत असल्याने पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

नागपूर पोलिसांनी बेळगाव कारागृहातून जयेशला अटक केली. याशिवाय पोलिसांनी कारागृहातील कैद्यांकडुन माहिती घेतली. हिंडलगा कारागृहातील कैद्यांकडुन पोलिसांनी जयेशजवळ असलेल्या मोबाईल फोनची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. हिंडलगा कारागृहामधील जयेश या नावाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला होता. कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. यापूर्वी नितीन गडकरी यांना धमकी दिल्याप्रकरणी बंगळूर येथील एका तरुणीला ताब्यात घेण्यात आले होते. ही तरुणी बंगळुरू येथील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करते. गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून धमकी देणाऱ्याने एक नंबर देत या नंबरवर दहा कोटी रुपयांची खंडणी पाठवण्यास सांगितले होते. हा नंबरचा तपास केला असता हा नंबर बंगळूर येथील एका तरुणीचा असल्याचे आढळून आले. तसेच, तिचा एक मित्र कारागृहात असल्याची माहिती तपासात समोर आली होती.

error: Content is protected !!