Home » हॉस्पिटलमधील फार्मसीतूनच औषधी खरेदीचे बंधन नाही

हॉस्पिटलमधील फार्मसीतूनच औषधी खरेदीचे बंधन नाही

by Navswaraj
0 comment

अकोला : खासगी दवाखाने आणि हाॅस्पिटल मधे वा शेजारी औषधी दुकाने असतात. वैद्यकिय तपासणीसाठी गेल्यावर किंवा हाॅस्पिटलमध्ये भर्ती झाल्यावर डाॅक्टर औषधी लिहून देतात त्या त्याच दुकानातून खरेदी करण्याचा आग्रह करतात. लिहून दिलेल्या औषधी दुसऱ्या दुकानात उपलब्ध नसल्याचा अनुभव रूग्ण व त्याच्या नातेवाईकांना येतो. त्यामुळे नाईलाजाने तेथूनच खरेदी करण्याशिवाय पर्याय नसतो.

एमआरपीने तसेच कुठलाही डिस्काउंट न देता औषधी विकण्यात येत असल्यामुळे लोकांचे आर्थिक शोषण होत असल्याच्या तक्रारी आयुक्त अन्न व औषध तसेच शासनाला प्राप्त झाल्या होत्या. त्याची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने ९ डिसेंबरला राज्यातील सर्व विभागीय सहआयुक्त, सहाय्यक आयुक्त व औषध निरीक्षकांना पत्र दिले आहे. त्यात रूग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना दवाखान्यातील तसेच शेजारील दुकानातून औषधी खरेदी करण्याची सक्ती करण्यात येऊ नये, असे निर्देश दिले आहेत. रुग्ण व त्यांचे नातेवाईक कोणत्याही परवानाधारक औषधी विक्रेत्यांकडून औषध खरेदी करू शकतात या आशयाचे फलक रूग्णालयात दर्शनीय भागात प्रदर्शित करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात  असे नमूद केले आहे.

error: Content is protected !!