Home » संसाराच्या स्नेहातून कवीची निर्मिती होते : अशोक वाजपेयी

संसाराच्या स्नेहातून कवीची निर्मिती होते : अशोक वाजपेयी

आयुष्यातील अनुभवांच्या श्रीमंतीने नटलेली मुलाखत

by Navswaraj
0 comment

नागपूर : कवी संसाराच्या प्रेमातून तयार होतात, असे म्हणत ज्येष्ठ कवी अशोक वाजपेयी यांनी सांगितले की, जर आपल्याकडे साधन आहे किंवा साधन जमविण्याची क्षमता आहे, तर त्याचा उपयोग समाजासाठी आणि लोककल्याणकारी कामासाठी केला पाहिजे. कवी हे आयुष्यात येणाऱ्या अनुभवांनी आणि लोकांकडून मिळणाऱ्या प्रेमाने अधिक समृद्ध होतात. त्याचा उपयोग साहित्यात भर घालण्यात होऊ शकतो.

विदर्भ साहित्‍य संघाच्‍या शताब्‍दी वर्षानिमित्‍त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे. मराठी भाषेसोबतच इतरही भाषांचा सन्‍मान व्‍हावा, या उद्देशाने शनिवारी साहित्‍य अकादमी पुरस्‍कार विजेते प्रख्‍यात हिंदी कवी अशोक वाजपेयी यांच्‍या मुलाखतीचा कार्यक्रम आयोज‍ित करण्‍यात आला होता. झाशी राणी चौक, सीताबर्डी येथील विदर्भ साहित्‍य संघाच्‍या सांस्‍कृतिक संकुलातील चौथ्‍या मजल्‍यावरील अमेय दालनात झालेल्या या कार्यक्रमात अशोक वाजपेयी यांची मुलाखत दै. भास्‍कर ग्रुपचे समूह संपादक प्रकाश दुबे यांनी घेतली.
मुलाखती दरम्यान मध्यप्रदेश मध्ये अर्जुन सिंग शिक्षण मंत्री असताना वाजपेयी यांना मिळालेले संस्कृती सचिवपद आणि त्यांच्या योगदानाबद्दल विचारले असता संस्कृती जतन करताना स्मृती आणि कृतज्ञता यांचा पुनर्वास करण्याचा प्रयत्न आपण केल्याचे ते म्हणाले. तिजन बाई, अख्तरी बाई,अन्य लोककलावंत यांच्या माध्यमाने भारतीय कला परदेशात नेली. तसेच कलावंतांचा मंच म्हणून मध्य प्रदेश रंगमंडल स्थापन केल्याचा त्यांनी सांगितले.
सध्याच्या घडीला वक्तांव्यावरून जी असहमती निर्माण व त्याची हिंसक प्रतिक्रिया निर्माण होते. हे समाजासाठी घातक आहे. यावर परस्पर संवाद हाच एक मार्ग असू शकतो,असं मत प्रकाश दुबे यांनी यावेळी व्यक्त केले.

अशोक वाजपेयी यांच्या गाजलेल्या ‘मातेच्या प्रसवसमयीचे सौंदर्य’ बद्दल यावेळी साहित्यिक चर्चा झाली. कार्यक्रमाला विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, सरचिटणीस विलास मानेकर, डॉ चंद्रशेखर मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती. कविता आणि साहित्य प्रेमींनी मोठ्या संख्‍येने गर्दी केली होती. प्रफुल्ल शिलेदार यांनी परिचय करून दिला व आभार देखील मानले. श्वेता शेलगावकर यांनी प्रास्ताविक केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!