Home » नागपुरात डब्बा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाचे छापे

नागपुरात डब्बा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाचे छापे

by नवस्वराज
0 comment

नागपूर : आयकर विभागाच्या दीडशे जणांच्या पथकाने बुधवार, १० मे २०२३ रोजी नागपुरातील हवाला आणि डब्बा व्यापाऱ्यांवर छापे घातले. या घटनेमुळे उपराजधानीत खळबळ उडाली आहे. नागपुरात वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी ही कारवाई करण्यात आली. छापेसत्रामुळे व्यापाऱ्यांमध्ये चांगलेच भीतीचे वातावरण होते.

अधिकृत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रवी अग्रवाल, शैलेश लखोटिया, पारस जैन, लाला जैन, प्यारे खान, करनी थावरानी, गोपी मालू, हेमंत तन्ना, इजराइल सेठ, सीए रवी वानखेडे आदींच्या प्रतिष्ठानांवर हे छापे घालण्यात आले आहेत.

नागपुरातील रवी अग्रवाल यांचा कारभार मुंबईपर्यत पसरला आहे. भव्यदिव्य आयोजनांसाठी ते प्रसिद्ध आहेत. अग्रवाल यांचा छतरपूर फार्म प्रसिद्ध आहे. २०१५ मध्ये डब्बा कारभारात अग्रवालचे नाव पहिल्यांदा समोर आले होते. त्यावेळी पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. ईडीनेही अग्रवालचा तपास केला होता. नागपुरात अनेक वर्षांपासून हवाला आणि डब्बा गँग सक्रिय आहे. रवी अग्रवालची एल-७ ही कंपनी या कारभारात २००८ ते २०१५ दरम्यान पूर्णपणे सक्रिय होती असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्वांत पहिले अग्रवाल नागपूर पोलिसांच्या तावडीत सापडला होता. तत्कालीन महिला डीसीपी दीपाली मासूरकर यांनी कडक कारवाई केली होती. या डब्बा गँगमध्ये अग्रवाल सोबत करनी थावरानी, गोपी मालू, हेमंत तन्ना, इजराइल सेठ हे देखील सहभागी होते.

नागपुरातील प्रतिष्ठीत ट्रान्सपोर्ट व्यापारी प्यारे खानकडेही आयकर विभागाची धाड पडल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. भाजपाच्या अत्यंत जवळचा असलेल्या प्यारे खान यांनी ट्रान्सपोर्ट व्यवसायत कमी कालावधीत नजरेत येईल इतने यश मिळवले आहे. त्यांच्या विरोधात हवाला कारवाईत इनपूट मिळाल्याचे सांगण्यात येते. नागपुरातील एका मोठ्या भाजपा नेत्याच्या जवळचा व्यक्ती म्हणून प्यारे खान यांच्याकडे पाहिले जाते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!