Home » राज्यसंरक्षित स्मारकांवरील अतिक्रमणे हटवण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी

राज्यसंरक्षित स्मारकांवरील अतिक्रमणे हटवण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी

by Navswaraj
0 comment

संभाजीनगर (औरंगाबाद) : हिंदु विधिज्ञ परिषदेने ‘राज्यसंरक्षित स्मारकां’च्या संदर्भात माहिती अधिकारात काही प्रश्न विचारले होते. त्याच्या उत्तरांमध्ये धक्कादायक माहिती उघड झाली आहे. यासंदर्भात पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालकांकडून माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनुसार, संभाजीनगर येथील 33 राज्य संरक्षित स्मारकांवर अतिक्रमण झाले आहे, असे या विभागाने लेखी स्वरूपात उत्तर दिले आहे. याविषयी पुरातत्त्व विभागाने स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय यांनाही याविषयी कळवले असून वक्फ बोर्डासह सर्व अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीस बजावल्याचाही उल्लेख या उत्तरामध्ये केलेला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून अद्याप या अतिक्रमणाच्या संदर्भात कोणतीही कारवाई केलेली नाही. राज्यसंरक्षित स्मारकांवर अतिक्रमणे होईपर्यंत पुरातत्त्व विभाग झोपा काढत होता का आणि पुरातत्त्व विभागाने प्रशासनाला या अतिक्रमणाबद्दल कळवूनही जिल्हाधिकारी आणि स्थानिक नगरपालिकेचे अधिकारी काय करत होते, असा प्रश्न करत राज्यसंरक्षित स्मारकांवर झालेली अतिक्रमणे त्वरित हटवावीत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनिल घनवट यांनी केली आहे. या अतिक्रमणांच्या संदर्भात हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधिज्ञ परिषद यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी हिंदु विधिज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य सुरेश कुलकर्णी, हिंदु जनजागृती समितीच्या संभाजीनगर समन्वयक प्रियांका लोणेही उपस्थित होत्या.

यावेळी हिंदु विधिज्ञ परिषदेचे कुलकर्णी म्हणाले की, राज्य संरक्षित स्मारकांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. याला पुरातत्त्व विभाग उत्तरदायी आहे. राज्यसंरक्षित स्मारकांवर कोणीही अतिक्रमण करत असेल, तर राज्यात शासन-प्रशासनाचे काही अधिकार शिल्लक आहेत की नाहीत, असा प्रश्न निर्माण होतो. अतिक्रमणकर्ते इतके मुजोर झाले आहेत की, त्यांना शासन-प्रशासनाचा धाक राहिलेला नाही. या सर्व शासकीय विभागांची सद्य:स्थिती म्हणजे ‘आंधळा दळतो आणि कुत्रा पीठ खातो’, अशी झाली आहे.

error: Content is protected !!