Home » अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातील अतिवृष्टी

अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातील अतिवृष्टी

by Navswaraj
0 comment

अकोला : गेले 24 तासांपासून अकोला जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा व अकोट या दोन तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. संपूर्ण तेल्हारा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

तेल्हारा मंडळात 130 मिलिमीटर पाऊस झाला आहे. माळेगाव येथे 144 मिलिमीटर, आडगाव येथे 176 मिलिमीटर, पंचगव्हाण येथे 130 मिलिमीटर आणि हिवरखेड येथे 150 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अकोट तालुक्यातील उमरा येथे 70 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.  24 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय वाहतुकीवरील परिणाम झाला आहे. तेल्हारा आणि अकोट तालुक्यातील अनेक रस्ते पुराच्या पाण्याखाली असल्यामुळे रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे.

संततधार पावसामुळे अकोला शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या मोरणा नदीला पूर आला आहे. पुराच्या पाण्यामुळे जुने शहर भागातील रामसेतू हा पूल पाण्याखाली गेला आहे. अकोला शहरातील अनेक सखल भागांमध्ये ही पाणी साचले आहे. प्रशासन आणि हवामान विभागातर्फे देण्यात आलेला पावसाचा अलर्ट अद्याप कायम आहे. मोरणा नदीकाठच्या परिसरातील लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. दमदार पावसामुळे काटेपूर्णा प्रकल्प 38 टक्के भरला आहे, वानप्रकल्पामध्ये 45 टक्के जलसाठा आहे, मोरणा प्रकल्प देखील 48 टक्के भरला आहे. निर्गुणा प्रकल्पात 46 टक्के जलसाठा आहे. उमा प्रकल्प पूर्णपणे भरला असून दगडपारवा प्रकल्पात 61 टक्के जलसंचय झाला आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!