अकोला : कार्तिक शुक्ल पक्ष चतुर्दशीच्या (पौर्णिमा) पवित्र सणानिमित्त अकोल्यातील आराध्य दैवत श्री राज राजेश्वर मंदिरात भगवान विष्णू आणि शिव यांचा हरिहर मिलन उत्सव थाटात साजरा करण्यात आला.
यावेळी भगवान श्रीराज राजेश्वर शिवलिंगावर प्रथम रुद्राभिषेक, षोडशपूजा व सत्तावन्न भोग अर्पण करण्यात आले. रात्री शिव तांडव नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर भगवान शिव आणि हरी (विष्णू) यांच्या भेटीची सांगता जयघोषाने झाली. वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर महाआरती करण्यात आली. उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई व विविध फुलांनी सजविण्यात आला होता. सांस्कृतिक आणि भोलेनाथांच्या एकापेक्षा एक भजनाने हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी शहराच्या कानाकोपऱ्यातून हरिहर भक्तांनी दर्शनासाठी रात्रीपर्यंत मोठी गर्दी केली होती.