Home » अकोल्यातील कुटासा येथील सरपंचासह सर्व सदस्य अपात्र

अकोल्यातील कुटासा येथील सरपंचासह सर्व सदस्य अपात्र

by Navswaraj
0 comment

अकोला : अनधिकृतरित्या बांधकाम पाडल्याप्रकरणी अकोला जिल्ह्यातील कुटासा येथील सरपंचासह बारा सदस्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने याचिका निकाली काढताना हा निर्णय दिला आहे.

विजयसिंह सोळंके यांनी ही याचिका दाखल केली होती. ग्रामपंचायतीची इमारत पूर्व परवानगी न घेता पाडल्याचे हे प्रकरण होते. याप्रकरणी ग्रामविकास विभागाने सुनावणी दरम्यान गटविकास अधिकारी, अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त यांच्या अहवालासह सर्व साक्षी पुरावे तपासले. सुनावणी दरम्यान सरपंचासह सर्व सदस्य दोषी आढळले.

याचिका निकाली काढताना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी कुटासा ग्रामपंचायतीचे सरपंच अनंता लाखे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ओमकार रामागडे, निर्मला वाळके, सोनू झास्कर, निर्मला कापसे, प्रवीण ढोके, श्याम राऊत, शोभा रेलकर, सोपान दवंडे, रेखा पोसे, संतोष इंगळे, कल्पना आठवले या बारा सदस्यांना अपात्र करण्याचे आदेश दिले आहेत. कुटासा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. अपात्र करण्यात आलेले सर्व सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गटातील समर्थक असल्याने ग्रामविकास विभागाचा हा आदेश आमदार अमोल मिटकरी यांना मोठा धक्का मानला जात आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!