Home » बहुमत चाचणीसाठी राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; 30 जूनला फ्लोअर टेस्ट

बहुमत चाचणीसाठी राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; 30 जूनला फ्लोअर टेस्ट

by नवस्वराज
0 comment

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवले आहे. याशिवाय विधान भवनाचे सचिव राजेंद्र भागवत यांनाही पत्र पाठवत राज्यपालांनी 30 जून 2022 रोजी विधान सभेचे खास सत्र बोलाविण्याचे आदेश दिले आहेत. राज्यपालांच्या पत्रानंतर आता महाविकास आघाडी सरकारला 30 जूनला सायंकाळी पाच वाजता बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी मुळे राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता अडचणीत आली आहे. विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेत महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याचे पत्र कोश्यारी यांना दिले होते. त्यानंतर राज्यपालांनी तातडीने पत्र पाठवत मुख्यमंत्री ठाकरे यांना बहुमत सिद्ध कारण्यास सांगितले आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपण उद्या म्हणजेच ३० जून रोजी मुंबईत येत असल्याची घोषणा केली आहे. शिंदे यांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतले. शिंदे यांनी देवदर्शनानंतर आपण उद्या मुंबईत येऊन बहुमत चाचणीसाठी हजर राहणार असल्याची घोषणा केली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर शिंदे यांनी गुवाहाटीमधील रेडिसन ब्लू या हॉटेलमधील बंडखोर आमदारांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीमध्ये पुढील निर्णय आणि वाटचालीसंदर्भात शिंदे यांनी सहकारी आमदारांशी चर्चा केली.

शिंदे यांना केंद्र सरकारने वाय दर्जाची सशस्त्र सुरक्षा पुरविली आहे. शिंदे जिथे जिथे जातील तिथे तिथे कडेकोट सुरक्षा तैनात करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यामुळे 30 जूनला विधान भवन, शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांच्या भोवती केंद्रीय सुरक्षा दलांचा कडक पहारा राहणार आहे. मुंबई पोलिसांनी आधीच कलम 144 लागू केले आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून त्यांनीही विधान भवनाला सुरक्षा वेढा घातला आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!