अकोला : सर्व लहान – मोठ्या गावांमधे खाजगी शिकवणी वर्गांचे पेव फुटले आहे. आपल्या वर्गातील किती विद्यार्थी, गुणवत्ता यादीत आले आहेत यासाठी नामंकित टीव्ही चॅनल, वृत्तपत्रांतून, बॅनर्स, तसेच अन्य प्रसिद्धी माध्यमातून शिकवणी वर्गाचे संचालक जाहिरात करतात. यासाठी लाखो रूपयांचा खर्च केला जातो. जाहिरात आणि भपका जितका मोठा शुल्क तेवढेच जास्त असते.
बऱ्याच शिकवणी वर्गाच्या संचालकांचे शाळा, महाविद्यालय व्यवस्थापनाशी आर्थिक हितसंबंध असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांनी विशिष्ट शिकवणी वर्गात प्रवेश घ्यावा असा अट्टाहास करण्यात येतो. विद्यार्थी गुणवत्ता यादीत येतीलच अशी खात्री काही शिकवणी वर्गाचे संचालक देतात, मात्र यासाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यात येते. अनेक शिकवणी वर्गाचे संचालक विद्यार्थ्यांना आरामदायक सेवा पुरवितात मात्र त्यांच्या जिविताच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून योग्य उपाययोजना करत नाही.
विद्यार्थ्यांना असामाजिक तत्वांचा त्रास होऊ नये म्हणून, शिकवणी वर्गात आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आवश्यक असते, ते लावले जात नाहीत. आग वगैरे अशा आपत्तीचा सामना करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत नाही. पालक देखील अशा अतिशय महत्वपूर्ण बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात, भविष्यात एखादी अनुचित घटना घडली की, शिकवणी वर्गाचे संचालक आणि शासनाच्या नावाने बोटे मोडतात. लाखो रूपये शुल्क आकारण्यार्या संचालकांनी विद्यार्थ्यांना योग्य शिक्षणा बरोबर सुरक्षितता देखील द्यावी.
वर्गाच्या प्रवेशद्वारावर पोलीस तसेच महिला पोलीस मदत कक्षांचा, अग्नीशमन दलाचा फोन, भ्रमणध्वनी क्रमांक ठळक अक्षरात लिहिलेली असावा. विद्यार्थ्यांच्या जिविताच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून केलेल्या उपाययोजनांची माहिती प्रदर्शित करावी. परिसरातील नागरीकांना शिकवणी वर्गामुळे उपद्रव होणार नाही याची योग्य दक्षता घ्यावी. स्थानिक प्रशासनाने देखील वेळोवेळी शिकवणी वर्गांचे सर्वेक्षण करून याबाबींची पुर्तता केल्याची खातरजमा करावी, शक्य असल्यास शुल्क आकारणीवर देखील नियंत्रण ठेवावे. अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.