Home » गोगानवमी विशेष : वाल्मिकी समाजाचे आराध्य गोगाजी

गोगानवमी विशेष : वाल्मिकी समाजाचे आराध्य गोगाजी

by नवस्वराज
0 comment

अकोला : श्रीराजराजेश्वर नगरी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कापुसनगरी अकोल्यात जन्माष्टमीच्या पर्वावर निघणारी श्री गोगाजी जन्मोत्सव यात्रा अनेक वर्षांची जुनी परंपरा आहे. अकोल्यातील पारंपरिक आणि वैविध्यपूर्ण उत्सवांपैकी हा एक उत्सव आहे. वाल्मिकी समाजासाठी गोगाजी हे आराध्य दैवतच. जन्माष्टमीनिमित्त जाणुन घेऊ या त्यांच्याबद्दल…

अकोल्यातून १९ ऑगस्ट २०२२ रोजी निघालेल्या शोभायात्रेतील झांकी.

कोविड महासाथीमुळे सुमारे अडीच वर्ष मिरवणूक निघाली नव्हती.

असे अनेक देखावे अकोल्यातील शोभारात्रेत होते.

असे अनेक आकर्षक देखावे शोभारात्रेत होते.वाल्मिकी समाजाचे आराध्य दैवत पूज्य गोगाजी जन्मोत्सव दरवर्षी अकोल्यासह विदर्भात अनेक ठिकाणी उत्साहात साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी वाल्मिकी समाजाकडुन वाजतगाजत अनेक ठिकाणी मिरवणूक काढली जाते. अकोल्यातील मिरवणुकीला अनेक वर्षांची परंपरा आहे. असे सांगितले जाते की सम्राट पृथ्वीराज चव्हाणनंतर त्या वंशाचे प्रसिद्ध आणि प्रतिभावंत राजा जाहरवीर गोगाजी होते. त्यांना सापांचे देवता, जाहरवीर आणि नागराजाचे अवतार मानतात. गोगाजी यांच्या आई बाछलदेवी मुलबाळ नसल्याने त्या नाथपंथाचे गुरू तथा शिवअवतार असलेल्या गोरक्षनाथांना शरण गेल्या. नाथांनी त्यांना पुत्रप्राप्तीचे वरदान दिले. हा आशीर्वाद देताना नाथांनी त्यांना गुगल फळ प्रसादात दिले. कालांतराने विक्रम संवत १००३ भाद्रपद मासातील कृष्णपक्षाच्या नवमीला राजस्थानातील चुरू जिल्ह्यातील तारानगर तहसील येथे असलेल्या ददरेवा ( दत्तखेडा ) गावी गोगाजींचा जन्म झाला.

अकोल्यातील जुने शहरातून शुक्रवारी सायंकाळी शोभायात्रा निघाली.

अकोल्यातील जुने शहर भागात वाल्मिकी समाजाची मोठी संख्या आहे.

दरवर्षी कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी अकोल्यात शोभायात्रा निघत असते.

गुगल फळाच्या नावावर त्यांचे नाव गोगाजी पडले, असे सांगितले जाते. ते गोरखनाथांचे शिष्य होते. अतिशय शूर योद्धे म्हणून त्यांची ख्याती होती. एका युद्धात सतलजच्या मार्गाचे संरक्षण करताना त्यांना हौतात्म्य आले. वाल्मिकी समाज त्यांचा जन्मोत्सव, कृष्णपक्षाच्या नवमीला साजरा करतो. याच दिवसाला गोगानवमीही संबोधले जाते. परंपरागत आणि श्रद्धेने हा उत्सव वाल्मिकी समाज साजरा करतो. गोगादेवांची पूजा श्रावणी पौर्णिमेला सुरू होते. पूजापाठ, होमहवन नऊ दिवस चालतात. नवमीपर्यंत हा उत्सव चालतो. गोगानवमीला भक्त इष्टदेवाची वेदी बनवून अखंड ज्योत जागरण करतात. त्यांच्या जन्म व शौर्य कथांचे वाचन करण्यात येते. त्याला ज्योत कथा जागरणही म्हटले जाते.

वाल्मिकी समाजाच्या या शोभायात्रेचे अकोल्यात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

गोगाजी यांच्यासंबंधातील अनेक देखावेही शोभायात्रेत असतात.

हा उत्सव मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. महाराष्ट्रातील अकोल्यात वाल्मिकी समाज शेकडो वर्षांपासून वास्तव्यास आहे. त्यामुळे येथेही या उत्सवाची जुनी परंपरा आहे. अकोल्यातील वाल्मिकी समाज मोठ्या उत्साहात गोगाजी जन्मोत्सव साजरा करतात. कालाष्टमीला अकोल्यातील विजयनगर, शिवाजीनगर, चौरे प्लॉट, शंकर नगरातील भक्त निशाण घेऊन शोभायात्रा काढतात. अकोल्यातील मोर्णा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या गणेश घाटावरील गोगाजी महाराजांच्या मंदिरात पूजा व प्रसादने शोभारात्रेचा समारोप होतो.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!