अकोला : प्रभू रामचंद्र हे भारतीय संस्कृतीचे जनक असून भारतीय संस्कृती ही जगातील सर्वोच्च संस्कृती आहे. या महान व नैतिक संस्कृतीचे युवकांनी जतन करण्याचे आवाहन श्रीदेवनाथ पीठाधीश्वर व विश्व मांगल्य सभाचे सभाचार्य आचार्य जितेद्रनाथ महाराज यांनी केले. विश्वमांगल्य सभा अकोल्याच्यावतीने स्थानीय शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा सामूहिक रामरक्षा स्तोत्र पठण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
यावेळी जितेंद्रनाथ महाराज हे बोलत होते. मंचावर विद्याभारतीचे विदर्भ अध्यक्ष रामचंद्र देशमुख, विद्याभारतीचे संघटन मंत्री शैलेश जोशी, नगर संघचालक गोपाल खंडेलवाल, विश्वमांगल्य सभाच्या राष्ट्रीय अध्यक्षा रेखादेवी खंडेलवाल, अ.भा. धर्म शिक्षा संयोजिका राधिका कमाविसदार, विश्व मांगल्य सभाच्या विदर्भ प्रांत अध्यक्षा अंजली कोडापे, सभाच्या प्रांत संघटन मंत्री तेजसा जोशी, राष्ट्रीय महासचिव सोनिया तराळकर, राधिका कमाविसदर, तारा हातवळणे, विदर्भ प्रांत संघटन मंत्री तेजसा जोशी, अकोला महानगर अध्यक्ष स्वाती झुनझुनवाला, समीर थोडगे, शरद वाघ, डॉ. विक्रम जोशी, गिरीश कानडे, साधना बडगे, योगेश मल्लेकर, मृणाल कुलकर्णी आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत या सोहळ्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सामूहिक रामरक्षा स्त्रोत पठण केले. यावेळी रंजना बिजवे व डॉ. राधिका कमाविसदार यांनी रामरक्षा पठण केले. या सोहळ्यात अकोला महानगरातील विविध शाळांचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.