अकोला : जिल्हाभरात हैदोस घालणाऱ्या सात जणांच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. अमरावती परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिना यांनी ही कारवाई केली. अकोल्याचे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हा प्रस्ताव पाठविला होता.
टोळीचा म्होरक्या सुहास सुरेश वाकोडे (वय २५), ऋतीक सुधीर बोरकर (वय २०), गणेश राजू कटले (वय २५), राहुल नामदेव मस्के (वय २१), सोनू ऊर्फ विशाल सुनिल मंदिरेकर (वय २१), विशाल महादेव हिरोळे (वय २२), दर्शन सुभाष नंदागवळी (वय २३) ही कारवाई करण्यात आलेल्या कुख्यातांची नावे आहेत. सातही जणांविरुद्ध अनेकदा पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. मात्र त्यालाही ही टोळी जुमानत नव्हती. अनेक भागात या टोळीने दहशत निर्माण केली होती. सातत्याने गुन्हे करण्याचा त्यांचा सपाटा सुरूच होता. त्यामुळे सिव्हिल लाईन्स पोलिसांनी याप्रकरणी मोक्काचा प्रस्ताव तयार करून तो पोलिस अधीक्षक श्रीधर यांना दिला. या प्रस्तावाला पोलिस महानिरीक्षकांनी मंजुरी प्रदान केली. या टोळीविरुद्ध हत्येसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.