गडचिरोली : भारत सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार ३० सप्टेंबर २०२३ नंतर २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर माओवाद्यांनी बेकायदेशीर रित्या जमवलेले पैसे, ते लोकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणाहून बदलून घेत आहेत. अशाच मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून २७ लाख ६२ हजार रुपयाची बेकायदेशीर रक्कम गडचिरोली पोलिसांनी जप्त केली आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे, माओवादी काही गावकऱ्यांच्या माध्यमाने २ हजार रुपयांच्या नोटा बदलून घेत आहेत. या नोटा दोन इसम घेऊन येत आहेत. अशी माहिती पोलिसांना मिळताच अहेरी परिसरात नाकाबंदी लावण्यात आली. दरम्यान दोन संशयीत युवक मोटारसायकलने येताना दिसले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून २ हजार, ५००, २००, १०० अशा विविध नोटा अशी २७ लाख ६२ हजार रुपयाची बेकायदेशीर रक्कम आढळून आली. या रक्कमेबाबत विचारपुस केली असता त्यांना समर्पक उत्तर देता आले नाही. पोलिसी हिसका दाखविताच रक्कम माओवादी संघटनेची असून २ हजार रुपयाच्या नोटा बदलविण्यासाठी दिले गेले आहेत, अशी माहिती त्या तरुणांनी दिली. रोहीत मंगु कोरसा (वय २४) रा. घोरड, ता. एटापल्ली जि. गडचिरोली, बिप्लव गितीश सिकदार (वय २४) रा. पानावर जि. कांकेर (छ. ग.) अशी आरोपींची नावे आहेत. दोघांवर यूएपीए अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.