Home » वाशीम जिल्ह्यात अपघात चार ठार, १२ जखमी

वाशीम जिल्ह्यात अपघात चार ठार, १२ जखमी

by Navswaraj
0 comment

वाशीम : महामार्गावर उभ्या ट्रकला खासगी बसने मागून दिलेल्या धडकेत चार जण ठार झालेत तर १२ प्रवासी गंभीर जखमी झालेत. मालेगाव-मेहकर रोडवर वडप गावाजवळ सोमवारी हा अपघात घडला.

वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची पी.वाय-०५ ई १९५८ क्रमांकाची प्रवासी बस मालेगावमार्गे पुण्याकडे जात होती. बस प्रवाशांसह वडप गावाजवळ आली त्यावेळी चालकाने बसवरील नियंत्रण अचानक सुटले. त्यामुळे ही बस आर.जे. ४७-जी.ए. १८५० क्रमांकाच्या ट्रकवर धडकली. या अपघातात मंगेश शेषराव तिके (वय २५, रा. वाघजाळी जि. वाशीम), अक्षय प्रभु चव्हाण (वय २३, रा. साखरा जि. यवतमाळ), दीपक सुरेश शेवाळे (वय २७, रा. गणेशपुर केनवड जि. वाशीम) आणि अजय भारत शेलकर (वय २३, रा. कडसा जि. यवतमाळ) यांचा मृत्यू झाला.

अपघातात १२ प्रवासी जखमी झालेत. सुशिला राठोड (वय २५), रवी राठोड (वय ३२), संदेश चव्हाण (वय २०), स्वाती राठोड (वय ७), देविदास आडे (वय ४०), रविंद्र गुंजकर (वय ३९), भीमराव वाकुडे (वय ६५), अमोल मनोहर (वय २९), संजय राठोड (वय ४०), विठ्ठल राठोड (वय ४५) रामचरण राऊत (वय ६४) आणि विठ्ठल केनवडकर (वय ३६) हे गंभीर जखमी झालेत. अपघाताची माहिती १०८ क्रमांकावर मिळताच अवघ्या काही मिनिटांत रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिक चालक राहुल सांगळे आणि डॉ. हेमंत जोरेवार यांनी सर्व जखमींना तातडीने मालेगाव रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना वाशीम जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. वडप गावाजवळ घडलेल्या अपघातानंतर खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या अपघातग्रस्त बसचा चालक घटनास्थळावरून फरार झाला. या अपघात प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात बसच्या समोरील भागाचा चुराडा झाला.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!