Home » श्रीगुरुदेव सेवाश्रमावर ८७ वर्षांनंतर भगव्याच्या जागी तिरंगा

श्रीगुरुदेव सेवाश्रमावर ८७ वर्षांनंतर भगव्याच्या जागी तिरंगा

by नवस्वराज
0 comment

राष्ट्रसंतानी आष्टी, चिमूर स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी १९४२मध्ये काही दिवसांसाठी चिमूर ब्रिटिश राजवटीतून स्वतंत्र झाले होते. या लढ्यात महाराजांना अटक झाली होती. राष्ट्रसंत स्वातंत्र्य सैनिक तर होतेच, याशिवाय थोर पुरोगामी व देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे संत होते. प्रथम देश, मग धर्म; अशी महाराजांची शिकवण होती. त्याचेच पालन करीत आश्रमवरील भगवी पताका बाजूला फडकवित त्याजागी सर्वांत उंचावर राष्ट्रध्चज तिरंगा फडविण्यात आला आहे.

– डॉ. राजाराम बोथे

 

गुरुकुंज आश्रम (मोझरी, जि. अमरावती) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या महाद्वारावर ८७ वर्षांनंतर प्रथमच भगवी पताका बाजूला करीत तिरंगा ध्वज फडकविण्यात आला आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ४ एप्रिल १९३५ रोजी गुडीपाडव्याला अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाची मुहूर्तमेढ अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे रोवली. सेवाश्रमावर सर्वप्रथम भगवी पताका फडकविण्यात आली होती. त्यांनतर जेव्हा राष्ट्रसंत दौऱ्यानिमित्त देश विदेशात भ्रमण करायचे तेव्हाच महाद्वारावरील भगवी पताका अर्ध्यावर आणली जात होती. जेव्हा राष्ट्रसंत आश्रमात परतायचे तेव्हाच अर्ध्यावरील पताका पुन्हा उंचावर फडकविण्यात येत होती.

राष्ट्रसंतांचे महानिर्वाण ११ ऑक्टोबर १९६८ रोजी झाले, तेव्हापासून आश्रमाच्या महाद्वारावरील भगवी पताका राष्ट्रसंत कार्यरुपाने आश्रमात सदैव वास करीत आहे, असे समजत अविरत फडकलेली ठेवण्यात येते. ती कधीच अर्ध्यावर अथवा खाली काढून ठेवली जात नाही. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रसंतांनी सहभाग घेतला होता. तेव्हा त्यांनी ‘पत्थर सारे बॉम्ब बनेगे भक्त बनेगी सेना..’ हे भजन म्हटल्याने इंग्रजांनी २८ आगस्ट १९४२ रोजी चंद्रपूर येथून महाराजांना अटक करीत नागपूर जेलमध्ये ठेवले होते. नंतर सप्टेंबर १९४२मध्ये नागपूर येथुन रायपूर मध्यवर्ती कारागृहात राष्ट्रसंतांना ठेवण्यात आले होते. १९६५ मध्ये भारत चीन युद्धात प्रत्यक्ष नेफा बॉर्डरवर जाऊन राष्ट्रसंतांनी ‘तैयार हुआ हिंद तुम्हारे साथ, आवो चिनिओ मैदानमें देखो हिंद का हाथ..’ अशा एकापेक्षा एक जाज्वल्य व देशभक्तीने ओतप्रोत भजनांचे गायन करीत भारतीय सैनिकांचे मनोबल वाढविले होते. राष्ट्रसंतांचे हे भजन बरेच गाजले होते.

‘अपनी शान को मान नहीं जब देश की शान बिखर जावे..’, असे राष्ट्रसंतांनी आपल्या रचनेतही लिहिले आहे. त्यामुळे आजही राष्ट्रसंताच्या राष्ट्रभक्तीचे स्मरण प्रत्येकाला होते. संपूर्ण राष्ट्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाने ८७ वर्षांपासून आश्रमावर अविरत फडकत असलेली भगवी पताका बाजूला फडकवून त्याजागी मोठ्या दिमाखात तिरंगा फडकविला आहे. सेवाश्रमावर फडकलेला तिरंगा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाची साक्ष देत आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!