Home » चंद्रपुरात काँग्रेस नेत्यावर बुरखाधारकाचा गोळीबार

चंद्रपुरात काँग्रेस नेत्यावर बुरखाधारकाचा गोळीबार

by Navswaraj
0 comment

चंद्रपूर : काँग्रेसचे नेते, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे चंद्रपुरात खळबळ उडाली आहे. रावत गोळीबारातून थोडक्यात बचावले. यापूर्वी नागपुरातील भाजपा नेते तथा देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मित्र, माजी महापौर संदीप जोशी यांच्यावरही गोळीबार झाला होता. या प्रकरणाचा छडा आजपर्यंत लागलेला नाही. अशात रावत यांच्यावर गोळीबार झाल्याने नेते आणि जनता किती सुरक्षित असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गुरुवार, ११ मे २०२३ रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारात हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. संतोष रावत यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या डाव्या हाताला गोळी लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत. गोळीबार करताच हल्लेखोरांनी वाहनातून पळ काढला. एम.एम. ३४ | ६१५२ क्रमांकाच्या स्वीफ्ट डिझायर कारमधुन हल्लेखोर आले होते. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोरून दुचाकीने रावत जात असताना हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला.

गोळीबारात यात एक गोळी त्यांच्या हाताला स्पर्श करुन गेली. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. एका बुरखाधारक व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती समोर आली. हल्ल्यानंतर हल्लेखोर नागपूरमार्गे पसार झालेत. या हल्ल्याप्रकरणी संतोष रावत यांनी मूल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस तपास करीत आहेत. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात येत असून हल्ला करत असतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!