Home » तेल्हाऱ्यात आढळला बनावट खत कारखाना

तेल्हाऱ्यात आढळला बनावट खत कारखाना

by Navswaraj
0 comment

तेल्हारा (जि. अकोला) : कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकत आठ लाख पाच हजार ९५० रुपयांचा खताचा साठा जप्त केला. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात पंचायत समिती व कृषी विभागाने ही संयुक्त कारवाई केली असून, तेल्हारा पोलिस स्टेशनला या संदर्भात कृषी विभागाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिस आणि कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तेल्हाऱ्यातील एमआयडीसी परिसरात संशयास्पद कृषी निविष्ठा निर्मिती होत असल्याची माहिती कृषी विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. तालुकास्तरीय भरारी पथकद्वारे एमआयडीसी परिसरात तपासणी करण्यात आली. राहुल सरोदे नामक व्यक्तीच्या युनिटमध्ये खत निर्मिती सुरू होती. त्यांना याबाबत दस्तऐवजाची मागणी केली असता त्यांनी माहिती सादर केली नाही. या खत उत्पादक युनिटचा कुठलाही वैध परवाना नसतानाही उत्पादन सुरू होते. नामदेव अग्रो अशा नावाने येथे खत निर्मिती केली जात होती. घटनास्थळी अंदाजे आठ लाख पाच हजार ९५० रुपये किमतीचा माल आढळला.

सरोदे यांना विचारपूस केली असता आम्ही तीन महिन्यापूर्वी युनिट सुरू केले होते, असे सांगितले. सोबतच त्यांनी अंतिम उत्पादनाची कुणालाही विक्री केली नसल्याचे विरोधाभासी उत्तर दिले. त्यानंतर ते कुणालाही न सांगता घटनास्थळावरून निघून गेले. ही बाब संशयास्पद असल्याने व कोणताही उत्पादक परवाना नसताना देखील येथे खत निर्मिती होत असल्याने खताचे नमुने पांचासमक्ष घेऊन पुढील कार्यवाही साठी पाठवण्यात आले. येथे निर्मिती कृषी निविष्ठांबाबत विक्रिबंद आदेश देण्यात आला. त्यानंतर कृषी विभागाच्या भरारी पथकाने तेल्हारा पोलिस स्टेशनमध्ये बनावट खत निर्मिती कारखान्याच्या संचालकांविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली. पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. ही कारवाईत तालुका स्तरीय भरारी पथकाचे तेल्हारा तालुका कृषी अधिकारी नरेंद्र राठोड, पंचायत समितीचे कृषी अधिकारी भरतसिंग चव्हाण, तेल्हारा मंडळ कृषी अधिकारी गौरव राऊत यांनी केली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!