वीजग्राहकांना ‘जोर का झटका’! ऐन सणांत वीजदरवाढ
अकोला : वीज खरेदी खर्चात वाढ झाल्याने महावितरणकडून वीजबिलांत इंधन समायोजन आकार वसूल केला जाणार आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात जनतेला वीजदरवाढीचा झटका सहन करावा लागणार आहे. घरगुती वीज ग्राहकांना सप्टेंबरच्या बिलासाठी प्रति युनिट ३५ पैसे जादा द्यावे लागणार आहेत.
यासंदर्भात महावितरणच्या मुख्य अभियंतांनी (वीज खरेदी) आदेश काढले आहेत. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे महावितरणकडून सप्टेंबरच्या वीजबिलात इंधन समायोजन आकार वसूल केला जाणार आहे. दारिद्र्यरेषेखालील, तसेच पाचशे युनिटपेक्षा अधिक वीज वापरकर्त्यांवरही त्याचा परिणाम होणार आहे.
कृषी वीजजोडणी असलेल्या ग्राहकांना प्रति युनिट दहा व पंधरा पैसे, तर औद्योगिक ग्राहकांना प्रति युनिट २० पैसे जादा द्यावे लागणार आहेत. महावितरणला मार्च, एप्रिल व मे महिन्यांत अल्पकालीन करार व पॉवर एक्स्चेंजद्वारे अतिरिक्त वीज खरेदी करावी लागली होती. त्याची भरपाई म्हणून सप्टेंबर महिन्याच्या वीजबिलात इंधन समायोजन आकार वसूल केला जाणार आहे.