Home » कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले

by नवस्वराज
0 comment

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केली आहे. १० मे रोजी कर्नाटक विधानसभेची निवडणूक होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी बुधवार, २९ मार्च रोजी ही घोषणा केली. मतमोजणी १३ रोजी होणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली. यासोबतच कर्नाटकात आचारसंहिता लागू झाली आहे. आगामी निवडणुकीसाठी, काँग्रेसने नुकतीच १२४ उमेदवारांची नावे जाहीर केली. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे वरुणामधून तर कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार कनकापुरा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. कर्नाटकात 2018-19 मध्ये पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या 9.17 लाखांनी वाढली आहे. 1 एप्रिलपर्यंत वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे सर्व तरुण मतदार कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदान करु शकतील, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. तसंच कर्नाटक राज्यातील 224 विधानसभा मतदारसंघात 5,21,73,579 नोंदणीकृत मतदार आहेत. राज्यभरात 58,282 मतदान केंद्रे उभारणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली.

2018 मधील कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम 27 मार्च रोजी जाहीर झाला होता. यंदा आज म्हणजेच 29 मार्च रोजी तारखा जाहीर झाल्या आहेत. मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही एकाच टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ 24 मे रोजी संपत आहे. कर्नाटकमध्ये 2018 च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. भाजपने 224 जागांपैकी 104 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने 80 जागा आणि जेडीएसने 37 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसच्या आमदारांनी बंड केलं आणि भाजपमध्ये सामील झाले. कर्नाटकात सध्या भाजपकडे 119 जागा आहेत. तर काँग्रेसकडे 75, तर मित्रपक्ष जेडीएसकडे एकूण 28 जागा आहेत.

 

error: Content is protected !!