Home » अकोल्यात डेप्यूटी नव्हे आता आरटीओ ऑफीस

अकोल्यात डेप्यूटी नव्हे आता आरटीओ ऑफीस

by Navswaraj
0 comment

अकोला : अकोल्यातील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयासह राज्यातील काही कार्यालयांचे ‘अपग्रेडेशन’ करण्यात आले आहे. गृह विभागाने यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

राज्यातील १७ कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात फेरबदल आणि दर्जावाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार अकोला येथे यापुढे उपप्रादेशिक (डेप्युटी) नव्हे तर प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) स्थापन करण्यात येणार आहे. अकोला आरटीओ अंतर्गत बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्याचा कारभार चालणार आहे. गडचिरोलीच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना यापुढे नागपूर नव्हे तर चंद्रपूर आरटीओला रिपोर्टिंग करावे लागणार आहे. अमरावती आणि नागपूर ग्रामीणमध्ये अनुक्रमे अमरावती, यवतमाळ, नागपूर ग्रामीण, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश राहणार आहे.

या बदलांमुळे अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील नागरिकांना यापुढे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील कामांसाठी लांबचा फेरा पडणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. राज्यातील पुणे आरटीओमध्ये बारामतीचा समावेश करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र आरटीओची स्थापना करण्यात आली आहे. सोलापूर, धुळे, जळगाव खानदेश, नाशिक, अहमदनगर, ठाणे, वसई, नागपूर ग्रामीण, चंद्रपूर, पश्चिम मुंबई, बोरीवली, कोल्हापूर, सातारा आरटीओच्या कार्यक्षेत्रातही व्यापक बदल करण्यात आले आहेत.

error: Content is protected !!