अकोला : होळीच्या एक रात्र पूर्वी व होळीच्या दिवशी विदर्भातील विविध भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे अकोला व नागपूर सह सर्वत्र तापमानात घट झाली आहे. अकोल्यात अवकाळी पावसामुळे एकाच दिवसात कमाल तापमानात दहा अंश सेल्सिअस तर किमान तापमानात चार अंश सेल्सिअस घट झाली आहे.
नागपूर येथील भारतीय मौसम विभागाच्या प्रादेशिक वेधशाळेने ‘नवस्वराज’ला ही माहिती दिली. अवकाळी पावसामुळे वातावरणात हा बदल जाणवत असल्याचे मौसम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सोमवारी दिवसाला सुरुवात झाली त्यावेळी तापमानाची अधिकतम नोंद 35.7 अंश सेल्सिअस होती. पावसाला सुरुवात झाल्यानंतर झपाट्याने पारा खाली घसरला. त्यामुळे तापमान 17 अंशांवरती पोहोचले.
मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण व पावसाच्या सरींमुळे पारा कमाल पातळी 25 अंश सेल्सिअसच गाठू शकला. बुधवार 8 मार्च रोजी ही कमाल तापमान 11 अंश सेल्सिअसनी खाली घसरले. अकोल्यात अधिकतम तापमान 25.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले. किमान तापमान 4 अंश सेल्सिअसने घसरून 13. 4 अंशावर नोंदले गेले. वातावरणातील या बदलामुळे अकोल्यासह पश्चिम विदर्भात गारठा प्रचंड वाढला आहे. प्रादेशिक वेधशाळेने पाच दिवस पावसाचा इशारा दिला असला तरी बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत कुठेही पावसाची नोंद नव्हती.
वातावरणातील या बदलांमुळे व्हायरल फिवरची साथ वाढीस लागण्याचा धोका आहे. कोविड महासाथीनंतर अनेकांच्या शरीरात व्यापक बदल झाला असून त्यानंतर होणारा सर्दी, खोकला बरा होण्यासाठी मोठा कालावधी घेत असल्याची माहिती नागपूरच्या बालरोगतज्ञ्ज डॉ. सोनाली मानकर यांनी दिली. विशेषतः बालकांमध्ये हाय फीवर, डायरियाची साथ सध्या विदर्भात वाढीस लागल्याची माहिती डॉ. मानकर यांनी दिली.