Home » मेळघाटातील ज्वलंत मुद्द्यांवर विधान सभेत गंभीर चर्चा

मेळघाटातील ज्वलंत मुद्द्यांवर विधान सभेत गंभीर चर्चा

by नवस्वराज
0 comment

मुंबई : विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मेळघाटचा दौरा केल्यानंतर विधान सभेत यासंदर्भात गुरुवार, २५ ऑगस्ट २०२२ रोजी अल्पकालीन चर्चा करण्यात आली. विदर्भातील आमदारांनी या चर्चेतून मेळघाट व आदिवासी भागातील ज्वलंत मुद्द्यांवर गंभीर चर्चा केली, उपायही सुचविले.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह महिला व बालविकास विभागाच्या माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर, गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी, शिवडीचे आमदार अजय चौधरी, अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके, रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल, माजी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे या मुद्द्यावर उपाय सुचविले.

अॅड. ठाकूर यांनी आमदारच भुमक्यांकडुन चटके घेऊन उपाय करीत असतील तर सामान्य आदिवासी अंधश्रद्धेला बळी पडतीलच असे नमूद करीत व्यवस्थेच्या डोळ्यात अंजन घातले. मेळघाटातील महिला व युवतींचे शोषण होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. गडचिरोलीतील आदिवासींचे प्रश्न व कुपोषणाकडेही लक्ष देण्याची मागणी आमदार होळी यांनी केली. कमी वयात होणारे विवाह, कमी वयातच होणाऱ्या एकपेक्षा अधिक प्रसुती, घरांमध्ये होणाऱ्या प्रसुती यामुळे मेळघाटातील प्रश्न गंभीर होत असल्याकडे आमदार खोडके यांनी लक्ष वेधले.

आमदार जयस्वाल यांनी आदिवासी भागांमध्ये रोजगार निर्मितीची गरज असल्याचे सांगितले. रोजगार नसल्याने आदिवासींचे सातत्याने स्थलांतर होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. आदिवासी भागांमध्ये अनेक एमबीबीएस डॉक्टर जाण्यास तयार नसतात. अशा डॉक्टरांऐवजी पर्यायी डॉक्टरांना कायम नेमणूक देण्यात यावी, अशी मागणी आमदार डॉ. शिंगणे यांनी केली. आदिवासी मंत्री विजय गावीत यांनी या मुद्द्यावर सर्वसमावेशक उपाय करण्याची ग्वाही यावेळी दिली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!