Home » अकोल्यातील कचरा वेचणाऱ्या मुलांना ज्ञानविश्व दाखविणारे ‘संजय’

अकोल्यातील कचरा वेचणाऱ्या मुलांना ज्ञानविश्व दाखविणारे ‘संजय’

by नवस्वराज
0 comment

नागपूर : महाभारत काळातील ‘संजय’च्या दृष्टीची कथा अनेकांनी ऐकली असेल,वाचली असेल आणि टीव्हीवरील मालिकांमधुन पाहिलीही असेल; पण अकोला जिल्ह्यातील एक शासकीय अधिकारी असेही आहेत जे गरीब मुलांसाठी ज्ञानाची दृष्टी देणारे ‘संजय’ ठरले आहेत. हे अधिकारी आहेत अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे.

प्रसन्न जकाते

शासकीय अधिकारी आणि त्यातही तो महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी म्हटला की त्याचा रुबाब, वातानुकूलित केबीन, अंबर दिवा असलेले सरकारी वाहन आणि बरेचदा अरेरावीची भाषा असे चित्र डोळ्यापुढे येते. पण अकोल्यातील निवासी उपजिल्हाधिकारी पदाची खुर्ची त्याला काहीशी  अपवाद ठरली आहे. गेल्या काही वर्षांत अकोल्यात असे काही अधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी पदावर सेवा देऊन गेले, ज्यांनी आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटविला. आजही अकोल्यातील अनेक नागरिक या अधिकाऱ्यांच्या आठवणी सांगतात. बरेच जण अद्यापही अशा अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत व ते अधिकारीही तितक्याच आपुलकीने हे ऋणानुबंध जपून आहेत. अशाच अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी ठरले आहेत प्रा. संजय खडसे.

प्रा. खडसे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी पदाचा प्रशासकीय कामकाज सांभाळत अकोल्यातील नायगाव परिसरातील डम्पिंग ग्राऊंडवर आगळीवेगळी शाळा सुरू केली आहे. ही शाळा आहे कचरा वेचणाऱ्या मुलांसाठी. या भागातील लोकवस्तीत राहणारी अनेक मुले शहरातून कचरा वेचतात. कचऱ्याच्या ढिगात या मुलांचे बालपण व शिक्षण कुजू नये, असे प्रा. खडसे यांना वाटले. जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी दर शनिवारी नायगाव भागातील एका सभागृहात या परिसरातील बालकांसाठी ‘संस्कार वर्ग’ सुरू केले. शिक्षणासोबत, संस्कार देण्याचे कामही त्यांनी हाती घेतले.

नायगाव येथील सभागृहात भरलेला हाच तो संस्कार वर्ग.

शनिवार, ६ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास ‘नवस्वराज’ने प्रा. खडसे यांच्याशी संपर्क साधला, त्यावेळीही ते ‘संस्कार वर्ग’ घेत होते. वर्गातील मुलांचा किलबिलाट कानावर पडत होता. ‘नवस्वराज’शी बोलताना वर्गातील मुलांकडे दुर्लक्ष होणार नाही, याचीही प्रा. खडसे बोलताना पुरेपूर काळजी घेत होते. कचरा वेचणारी मुले असली तरी त्यांनाही शिक्षणाचा हक्क आहे. ही मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहणार नाही, हाच प्रामाणिक हेतू या उपक्रमामागे असल्याचे प्रा. खडसे यावेळी म्हणाले. प्रा. खडसे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या ज्ञानगंगेच्या प्रवाहातून या संस्कार वर्गात शिकणाऱ्या मुलांमधुन भविष्यातील डॉक्टर, इंजिनीअर, आयएएस, आयपीएस अधिकारी घडावे व त्यांनीही ‘देणाऱ्याचे हात घ्यावे..’ या उक्तीप्रमाणे अशाच समाजनिर्मितीसाठी पुढाकार घेत ‘संजय’ बनावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!