Home » डाबकी रोड रेल्वे उड्डाणपूल आता वाहतुकीसाठी खुला

डाबकी रोड रेल्वे उड्डाणपूल आता वाहतुकीसाठी खुला

by Navswaraj
0 comment

अकोला : आठ वर्षांपासून ज्या क्षणाची प्रतीक्षा करीत होती, तो क्षण अखेर आला आहे. गायगाव मार्गावरील डाबकी रोड रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. हा पूल शनिवारपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.

दिवाळीपूर्वी अकोला व बुलडाणा जिल्ह्याला जोडणारा रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होत आहे. अकोला शहरातून तेल्हारा, निमकर्दा, गायगाव, शेगाव, जळगाव जामोदकडे जाणाऱ्या प्रवाशांना या पुलामुळे सुविधा मिळणार आहे. रेल्वे मार्गावरील फाटकामुळे येथे वाहतूक कोंडी होत होती.

माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार संजय धोत्रे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत डाबकी रोड उड्डाण पुलासाठी २५ कोटी रुपये मंजूर करून घेतले होते. परंतु अपुरा निधी, बांधकाम विभाग आणि रेल्वे विभागातील समन्वयाच्या अभावामुळे डाबकी रोड उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यास तब्बल आठ वर्ष लागली. रेल्वे विभागाच्या नवीन नियमानुसार पुलाच्या नकाशात बदल करावा लागला.

नकाशात बदल झाल्याने पुलासाठी वाढीव निधीची गरज होती. केंद्र सरकार ‘सीआरएस’ मध्ये वाढीव निधी देण्याची तरतूद नसल्यामुळे सुमारे १२.७० कोटी रुपये राज्य शासनाला भरावे लागले. हा निधी मंजूर करण्यात तीन वर्ष लागली. डाबकी रेल्वे फाटकावरील दोन्ही बाजूने एकूण १४९.४० मीटर लांबीचा उड्डाणपूल व दोन्ही बाजूच्या पोच मार्गासाहित एकूण ५४९ मीटर बांधकाम पूर्ण झाले आहे. आमदार गोवर्धन शर्मा यांनी डाबकी रोड रेल्वे उड्डाणपूल पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचे हे स्वप्न होते. त्यांच्या हयातीत ते पूर्ण होऊ शकले नाही. त्यांचे नुकतनेच निधन झाले. त्यामुळे कोणताही मोठा समारंभ न करता दिवाळीच्या निमित्ताने प्रवाशांच्या सोयीसाठी उड्डाणपुलाचे लोकार्पण शनिवारी होणार आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!