Home » हॅकर्सच्या जाळ्यात अकोला येथील व्यवसायिक

हॅकर्सच्या जाळ्यात अकोला येथील व्यवसायिक

by Navswaraj
0 comment

अकोला : सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक लोकांना सायबर गुन्हेगारांनी लाखो रूपयांनी लुबाडले आहे. काही लोक पुढे येऊन तक्रार दाखल करतात, तर काही लाजेपोटी पुढे येण्याचे धाडस करत नाही.

महानगरातील एका व्यवसायिका जवळ अॅपल कंपनीचा मोबाईल आहे. यात एक ई-सीम तर दुसरे अन्य कंपनीचे आहे. दोनतीन दिवसांपूर्वी सायबर गुन्हेगारांनी त्याच्या मोबाईल मधील व्हॉट्सअॅप आणि कॉन्टॅक्ट लिस्ट हॅक केली. घेतलेल्या कर्जाची ताबडतोब परतफेड करावी, असे एकापाठोपाठ दोन संदेश व्यवसायिकास आले आणि आपोआप डिलिट देखील झाले. मग व्हॉट्सअॅप वर व्यवसायिकाच्या फोटोसह कर्जाऊ घेतलेले रूपये पाच हजार भरावे असा संदेश आला. त्यानंतर रक्कम भरण्यासाठी न दिसणाऱ्या क्रमांकावरून पैसे भरण्यासाठी फोन आला. आपण कुठलेही कर्ज घेतलेले नाही पुन्हा फोन करू नये, असे बोलून व्यवसायिकाने फोन बंद केला.

नंतर जो प्रकार घडला त्यामुळे व्यवसायिकाला धडकीच भरली. व्हॉट्सअॅपवर व्यवसायिकाचा चेहरा असलेले काही अश्लील फोटो आणि व्हिडिओ त्याला पाठवले. तेच फोटो, व्हिडिओ व्यवसायिकाचा जास्त संपर्क असणाऱ्या त्याच्याच दुकानातील दोन कर्मचाऱ्यांना देखील पाठविण्यात आले, त्यामुळे ते देखील घाबरून गेले. ही बाब व्यवसायिकाने पोलिस विभागात कार्यरत असलेल्या आपल्या एका निकटवर्तीयाला सांगितली, व्हॉट्सअॅपवर आलेल्या संदेशाचे अनुषंगाने शोध घेतला असता मोबाईल क्रमांक परदेशातील असल्याचे निष्पन्न झाले. सायबर सेल मध्ये घडल्याप्रकाराची माहिती देण्यात आली असता, अशाप्रकारचे फोन, संदेश आल्यास कुठलेही प्रत्युत्तर न देण्याचा सल्ला दिला. प्रतिसाद दिला नाहीतर एकदोन दिवसात हा प्रकार बंद होईल असे सांगितले, फोन क्रमांक परदेशातील असला तरी वापर आपल्याच देशातून होत असल्याचे सांगण्यात आले.

असाच प्रकार अजून काही लोकांसोबत देखील घडला असल्याची माहिती समोर आली आहे, परंतु बदनामीच्या भीतीने त्यांनी तक्रार केली नाही किंवा गुन्हेगारांची मागणी पूर्ण केली असावी. असे फोन अथवा संदेश आल्यास नागरीकांनी निर्भिडपणे तक्रार द्यावी, जेणेकरून इतर लोक सावध होतील असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!