Home » यवतमाळात तीन लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

यवतमाळात तीन लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

by Navswaraj
0 comment

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात २१ जुलै रोजी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. काही तासांच्या पावसाने शेतकरी रस्त्यावर आला असून पीकहानीमुळे येत्या वर्षभर कुटूंबाचा भार कसा वाहायचा, या चिंतेत शेतकरी पडला आहे. पुरामुळे जिल्ह्यात झालेले नुकसान इतके मोठे आहे की त्यामानाने नुकसानाचे सर्वेक्षण अत्यंत संथ होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांतून होत आहेत.

झालेल्या सर्वेक्षणात नाव आहे, मात्र अद्याप सानुग्रह अनुदान मिळालेच नसल्याच्या तक्रारी आहेत. जिल्ह्यातील खरिपाच्या ३० टक्के शेतजमिनीवरील पिके वाहून गेली आहेत. प्राथमिक सर्वेक्षणानुसार, जिल्ह्यातील २ लाख ९५ हजार हेक्टरवरील पिके वाहून गेली आहेत. ७ हजार ८४५ हेक्टर शेतजमीन खरडून गेली आहे. त्यांच्या शेतातील सुपीक माती वाहून गेली असून अनेक शेतांत केवळ दगडधोंडे उरले असल्याचे शेतकरी सांगत आहेत. अशा ठिकाणी पुन्हा काही वर्षे तरी शेती करणे कठीण दिसत आहे. पुरामुळे जिल्ह्यातील १ हजार ७५३ गावे बाधित झाली आहेत; तर ६ हजार ५०८ घरांची पडझड झाली आहे. ११ हजार ४४६ कुटुंबांना पुराचा फटका बसला आहे. ३४४ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अतिवृष्टी होऊन नद्यांना पूर आल्यास जिल्ह्यातील ८२ गावे कायम धोक्याच्या स्थितीत असतात. त्यामुळे या गावांचे पुनर्वसन होणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी १५ सप्टेंबरपर्यंत या गावांचे पुनर्वसन करण्यासंबंधी अहवाल सादर करण्याचे निर्देश स्थानिक तहसीलदारांना दिले आहेत. उमरखेड तालुक्यातील पैनगंगेच्या काठावरील देवसरी गावाचा पुनर्वसनाचा प्रस्ताव शासनाकडे पुन्हा पाठविण्यात आला असून अनेक वर्षांपासून या गावाचे पुनर्वसन रखडलेले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!