Home » वर्ध्यात उपाशी कार्यकर्ते जिलेबी-भातावर ‘तुटून पडले’

वर्ध्यात उपाशी कार्यकर्ते जिलेबी-भातावर ‘तुटून पडले’

by Navswaraj
0 comment

वर्धा : उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या मेळाव्यानंतर ठेवण्यात आलेल्या जेवणाचा वर्ध्यात पुरता फज्जा उडाला. ज्या कार्यकर्त्यांच्या हाती लागले, त्यांनी भांडी रिकामी होईपर्यंत ताव मारला. मात्र काहींच्या हातात रिकाम्या प्लेटच राहिल्या. वर्ध्यातील दादाजी धुनिवाले सभागृहात खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा परिवर्तन मेळावा पार पडला. तेथे हा प्रसंग घडला.

या मेळाव्यात नियोजनशून्यतेमुळे जेवणावळीतील ओढाताण चांगलीच गाजली. मेळाव्यानंतर कार्यकर्त्यांसाठी जेवण होते. मेळावा संपल्यानंतर जेवणाच्या ठिकाणी एकाच वेळी झुंबड झाली. अक्षरश: प्लेटांची ओढाताण झाली. कार्यकर्त्यांनी जेवणाकरिता घेतलेला हा आक्रमक पवित्रा पाहून कॅटर्सच्या कर्मचाऱ्यांनी अक्षरशः स्टॉल सोडले. त्यानंतर त्या स्टॉलचा ताबा या कार्यकर्त्यांनी घेतला. भांडी रिकामी होईपर्यंत गोंधळ घातला. पहिल्यांदा जिलेबी आणि त्यानंतर मसाले भाताकडे कार्यकर्ते वळले. प्रचंड गर्दी व गोंधळामुळे बाहेर गावावरून आलेल्या काही कार्यकर्त्यांना उपाशीपोटीच जावे लागले.

error: Content is protected !!