Home » ब्राह्मणांनाच मोठे पद : धानोरकरांचा फडणवीसांवर निशाणा; भाजपची पोलिसांत तक्रार

ब्राह्मणांनाच मोठे पद : धानोरकरांचा फडणवीसांवर निशाणा; भाजपची पोलिसांत तक्रार

by नवस्वराज
0 comment

नागपूर : महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव लोकसभा खासदार बाळू धानोरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या जातीवाचक टिकेनंतर त्यांच्या विरोधात नागपूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिस ठाण्यात खासदार बाळु धानोरकर यांच्याविरोधात तक्रार दाखल करताना भाजयुमोचे पदाधिकारी.

खासदार धानोरकरांच्या विरोधात नागपुरातील धंतोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण समाजाचे आहेत. ब्राह्मणांच्या पोटी जन्माला येऊनच मोठे पद मिळते. जन्माला यायचे असेल, तर ब्राह्मणांच्याच पोटी यावे’, असे धानोरकर म्हणाले. त्यानंतर वादाला सुरुवात झाली.

खासदार बाळू धानोरकर यांनी काँग्रेसच्या ‘आझादी गौरव यात्रा’दरम्यान भाषणावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ब्राह्मण समाजाबद्दल वक्तव्य केले होते. या विधानावर भाजपच्या युवा मोर्चाने आक्षेप घेतला आहे. धानोरकर यांच्या विरोधात नागपूर शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने तक्रार देण्यात आली आहे. धानोरकर यांच्या वक्तव्याची चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. धानोरकरांच्या वक्तव्यामुळे समाजातील विविध जातींमध्ये तेढ निर्माण होऊन शांतता भंग होण्याची शक्यता आहे. दंगे पसरुन कायदा सुव्यवस्था भंग होण्याचीही भीती आहे. एका खासदाराकडून अशा पद्धतीने वक्तव्य करणे अत्यंत अशोभनीय आणि असंविधानिक आहे. त्यामुळे कलम १५३, १५३ अ, ५०४ अंतर्गत धानोरकरांवर कारवाई व्हावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाने केली आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!