Home » कॉपीबहाद्दरांना मोदींचा टोला; शिंदे फडणवीसांना हसू आवरले नाही

कॉपीबहाद्दरांना मोदींचा टोला; शिंदे फडणवीसांना हसू आवरले नाही

by Navswaraj
0 comment

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा २०२३’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून शुक्रवार, २७ जानेवारी २०२३ रोजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी कॉपीबहाद्दरांच्या मुद्द्यावर मोदींनी अशी फिरकी घेतली की मुंबईत हे थेट प्रक्षेपण पहात असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नागपुरातून हा कार्यक्रम पहात असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हसू आवरता आले नाही.

नागपुरातील न्यू इंग्लिश हायस्कूल येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘परीक्षा पे चर्चा २०२३’ या कार्यक्रमाला थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून उपस्थिती नोंदविली. विद्यार्थ्यांसमवेत बसून फडणवीस यांनी हा संपूर्ण कार्यक्रम बघीतला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे देखील या कार्यक्रमाचा ऑनलाईन आस्वाद घेत होते. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात हा संपूर्ण कार्यक्रम ‘लाइव्ह’ बघीतला. यावेळी कॉपीच्या प्रश्नाला उत्तर देत असताना मोदींनी विनोदी पद्धतीने उत्तर दिले ज्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनाही हसू आवरले नाही.

‘कॉपी करण्यात काही विद्यार्थी खूपच कल्पकता दाखवतात. जेवढ्या वेळात अभ्यास होऊ शकतो, तेवढा वेळ ते कॉपी करण्याचे मार्ग शोधत असतात. बारीक बारीक अक्षरात नोट बनवतात. पर्यवेक्षकाला कसे फसवले, हे ते अभिमानाने इतरांना सांगतात. आजकाल मूल्यांमध्ये बदल झाल्यामुळे कॉपी करण्यात कुणाला गैर वाटत नाही. पण कॉपी करुन तुम्ही एक परीक्षा पास व्हाल, पण जीवनाच्या इतर परीक्षेत तुम्ही काय करणार? आजच्या युगात प्रत्येक क्षणाक्षणाला परिक्षा द्यावी लागते. त्यामुळे कॉपी करण्याचा नाद सोडा आणि प्रामाणिक मेहनत करा’, असा संदेश मोदी यांनी दिला. मोदी हे सांगत असताना शिंदे आणि फडणवीस यांना हसू आवारले नाही.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!