Home » चिमुकल्याचा हट्ट भारी, मद्य न आले पुन्हा दारी

चिमुकल्याचा हट्ट भारी, मद्य न आले पुन्हा दारी

by admin
0 comment

यवतमाळ: आर्णी ते माहूर चौपदरी महामार्गावर लोनबेहळ हे बंजारा बहुल गाव आहे. येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत अंकुश सातव्या वर्गात शिक्षण घेत आहे. या चिमुकल्याने ग्रामसभेपुढे आक्रमक भूमिका घेत आपल्या वडिलांना दारू सोडायला भाग पाडले.

आर्णी येथील भारती विद्यालयात शिकणाऱ्या अंकुशला आपल्या लहान बहिणीला डॉक्टर बनवायचे आहे. अंकुशने हे स्वप्न उराशी बाळगत कठोर परिश्रम सुरू केले आहेत. परंतु आडे कुटुंब अत्यल्प भूधारक शेतकरी. घरची आर्थिक परिस्थिती बेताची. अशात वडिल राजू यांना दारूचे व्यसन. त्यामुळे मोलमजुरी करून मिळालेली रक्कम ते दारू पिण्यासाठी खर्ची घालतात. वडिलांचा सारा पैसा दारूत जात असल्याने कुटुंबाचे भरणपोषण व्यवस्थित होत नाही. संसाराचा गाडा हाकण्यासाठी पुरेसा पैसा हाती रहात नसल्याने अंकुशच्या आईचे खांदे जबाबदाऱ्यांच्या ओझ्याने थकले.

आई थकल्याने अंकुशने परिवाराची जबाबदारी वयाच्या तेराव्या वर्षीय खांद्यावर उचलली. गावात फेरी करीत भाजीपाला विकण्यास त्याने सुरुवात केली. ‘भाजी घ्या..भाजी…’, अशी आरोळी देण्यासोबतच वाकचातुर्याने तो व्यसनमुक्तीचा संदेशही गावकऱ्यांना देऊ लागला. दारू पिण्याचे तोटे व मुलांना सुशिक्षित करण्याचे फायदे तो गावकऱ्यांना सांगत आहे. अंकुशचे वाकचतुर्य महाराष्ट्रातील प्रसार माध्यमांवर झळकले. अंकुशचे सर्वत्र कौतुकही झाले. याचीच दखल घेत लोनबेहळ ग्रामपंचायतने ग्रामसभेत अंकुशला बोलावले. संधी मिळताच पठ्ठ्याने वडिलांना सोबत घेत ग्रामसभा गाठली.

ग्रामसभेत तो शांत बसला नाही, तर त्यानं वडिलांना असेलल्या दारूच्या व्यसनालाच लक्ष्य केले. वडिल नेहमी दारू पितात, त्यांनी व्यसन सोडवे अशी विनंती अंकुशने ग्रामसभेला केली. अंकुशने पोटतिडकीने केलेली विनंती मान्य करीत ग्रामसभेने राजू आडे यांना कान धरून पाच उठबशा काढाव्या व दारू पिणे सोडावे असा आदेश दिला. राजू आडे यांनीही आपल्या मुलाच्या प्रेमापोटी ही शिक्षा मान्य केली. उठबशा काढल्या. दारू सोडतोय असे वचन राजू यांनी ग्रामसभेत सर्वांसमोर दिले. अंकुशच्या या समयसूचकतेसाठी सरपंच मोनिका सुनिल राठोड, उपसरपंच शरद तिवारी, ग्रामसेवक मनोज सुरजूसे, विस्तार अधिकारी दादाराव चंद्रणारायन यांनी त्याचे कौतुक केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!